होळी दहनाचा शुभ मुहुर्त
24 मार्च रोजी पौर्णिमा तिथी सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुरू होईल आणि 25 तारखेला पौर्णिमा तिथी साडे बारा वाजता समाप्त होईल. धार्मिक मान्यतेनुसार, होलिका दहन हे भाद्र तिथीला पौर्णिमा तिथीला केले जाते. यावेळी 24 मार्चला होळी तर 25 मार्चला रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. 24 मार्चपासून पौर्णिमा तिथी सुरू होईल तेव्हापासूनच सुरु होणारा भद्रा काळ रात्री ११ वाजून १३ मिनिटांपर्यंत राहील. अशा स्थितीत भद्रा काळ संपल्यानंतरच होलिका दहन करणे शुभ ठरेल. होलिका दहनाचा शुभ मुहुर्त २४ मार्च रोजी रात्री ११ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत.
होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा सूतककाळ नाही
होळीवर चंद्रग्रहणाचा प्रभाव असे म्हटले जाते आहे पण या सगळ्या अफवा आहेत. २५ मार्चचे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेधाचे नियम पाळण्याची गरज नाही. होळी साजरी करण्यावर काहीही बंधने नाहीत. ज्या चंद्रग्रहणाबद्दल बोलले जाते आहे ते उपछाया चंद्रग्रहण असून त्यातील सुतक काळ वैध नाही. तेव्हा मनात कोणत्याही शंका ठेवू नका आणि जोशो उत्साहाता होळी-रंगपंचमीचा आनंद घ्या.
होलिका दहन विधी
आपल्याकडे होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते.
‘होलिकायै नमः’
होलिकेची पूजा केल्यानंतर ‘होलिकायै नमः’ असे म्हणून होळी पेटवली जाते. होळीला प्रदक्षिणा घालून पालथ्या हाताने बोंब मारली जाते. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध अन् तूप शिंपडून शांत करतता. श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य, तसेच नारळ अर्पण केला जातो. होलिका दहन नेहमी भद्रे नंतरच करावे. सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता आहे.
कोकणतला शिमगा
कोकणात होळीला शिमगा असेही म्हणतात. शिमगा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाच ते पंधरा दिवस कोकणात शिमगा साजरा होतो. या दिवसांमध्ये प्रत्येक गावातील देवांची पालखी काढली जाते.होळी उत्सवात कोकणात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डेरा नृत्य, जाखडी नृत्य, कातखेळ, गौरीचा नाच, चवळी नृत्य, शंकासुर, सवाल जवाब,गाऱ्हाणी यांसारखे अनेक कार्यक्रमाचे सादरीकरण उत्साहात होते. कोळी समाज या दिवशी समुद्राची पूजा करतात. त्यानंतर पारंपरिक गाणी, नृत्य,जेवण असा कार्यक्रम करून होळी साजरी करतात.
होळी सणाचा संदेश
होळी सण आपल्याला एका नवी सुरुवात करण्याचा संदेश देतो. जीवनातील नकारात्मक भावना, दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश आहे.