हायलाइट्स:
- छोटी कुमक असूनही कराड पोलिसांनी पेलले मोठे आव्हान.
- किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून रोखण्यात यश.
- रात्री बारा वाजताच पोलिसांनी ठरवला होता अॅक्शन प्लान.
कराड:कराड पोलीस ठाण्याकडे केवळ १२० पोलिसांची छोटी कुमक आहे. त्यातही पहाटेपासून पोलीस गणेश विसर्जनच्या बंदोबस्तात होते. अशावेळी रात्री त्यांना कुणकूण लागली की किरीट सोमय्या कराडमधून थेट कोल्हापूर गाठतील… मग त्यांना ताब्यात घेण्यासाठी चक्रे फिरू लागली… काहीही होवो… कराडमध्येच त्यांना अडवायचे… निर्णय पक्का झाला. सुदैवाने सोमय्या पुढे न जाण्यास राजी झाले पण पहाटे साडे चार ते साडे दहा पर्यंतचे सहा तास कराडमध्ये होता तो तणाव तणाव आणि तणावच… ( Kirit Somaiya Karad Latest News )
वाचा: किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कुणाच्या आदेशाने?; वळसे म्हणाले…
पोलिसांचा विरोध झुगारून किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. कोल्हापुरात त्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांची फौजच रस्त्यावर उतरणार होती. त्यामुळे राडा होणार हे जवळजवळ निश्चित होते. म्हणून काहीही करून त्यांना कोल्हापुरात प्रवेश न देण्यावर पोलीस ठाम होते. त्यानुसारच फिल्डींग लावण्यात आली. कराड, मिरज, सांगली, जयसिंगपूर यापैकी कुठेतरी ताब्यात घेण्याचे ठरले. कराडला रेल्वेतून उतरून ते मोटारीने कोल्हापूरला येऊ नयेत याचाही बंदोबस्त करण्यात आला. त्यामुळे ताब्यात घेण्याचे केंद्र अखेर कराडच ठरले. रात्री बारा वाजता हे केंद्र निश्चित झाले.
वाचा:… म्हणून भाजपचा सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न; सतेज पाटील यांचा आरोप
दिवसभर गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताने थकलेल्या पोलिसांना पहाटे तीन वाजताच रेल्वे स्थानकावर नव्या जोमाने बंदोबस्तासाठी नेमले गेले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह २७ अधिकारी आणि १२० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले. साडे चार वाजता महालक्ष्मी एक्सप्रेस कराडमध्ये येताच सोमय्या यांना पोलिसांनी गराडा घातला. त्यांचे निम्मे काम कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केले होते. कोल्हापूरला न जाता कराडलाच थांबण्याबाबत सोमय्या यांचे त्यांनी मन वळवले होते.
वाचा: मुंबईतील ‘त्या’ इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड?; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना
कराड रेल्वे स्थानकावरून सोमय्या यांना तातडीने सरकारी विश्रामधाम येथे नेण्यात आले. त्यांनी तेथे चहा घेतला. आंघोळ केल्यानंतर मी आता विश्रांती घेणार आहे, असे सांगून ते झोपायला गेले. मात्र त्या क्षणापासून पुन्हा तणाव वाढला. कारण त्यांना कराडला अडविल्याचे वृत्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळाले होते. इचलकरंजीहून काही कार्यकर्ते तेथे धडकले. भाजप आणि राष्ट्रवादीचे आणखी कार्यकर्ते तेथे आले आणि गोंधळ झाला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. त्यामुळे कराड हेच तणावाचे प्रमुख केंद्र बनले. त्या क्षणापासून विश्रामधामकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. संपूर्ण राज्याचे लक्ष आता कराडकडे लागले होते. तेथे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होवू नये याची संपूर्ण जबाबदारी आता पोलिसांची होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दोन तास विश्रांती घेतल्यानंतर सोमया यांनी नऊ वाजता पत्रकार बैठक घेतली. त्यानंतर काही वेळातच ते कराडहून मुंबईकडे रवाना झाले. सातारा जिल्ह्याची हद्द संपेपर्यंत पोलिसांचा फौजफाटा सोबत होताच. त्यांनी सातारा हद्द ओलांडली आणि तब्बल सहा तास कराडमध्ये असलेल्या तणावाला पूर्णविराम मिळाला.
वाचा: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अखेर जामीन; अर्जात केला ‘हा’ दावा