वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे तुकाराम बीज आहे. संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा संतरचना तुकारामांनी केल्या. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु, मानव असूनही सदेह वैकुंठगमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते.
चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला. व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे रहस्य सहज उलगडून दाखविले. संसारात वावरत असताना येणाऱ्या सुख-दुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन संत तुकाराम महाराजांनी केले.
मायबाप सवे नये धनवित्त । करावे संचित भोगावे ते ।।
म्हणऊनि लाभ काय तो विचारी । नको चालीवरी चित्त ठेवू ।।
आयुष्य सेवटी सांडूनि जाणार । नव्हेचि साचार शरीर हे ।।
तुका म्हणे काळे लावियेले माप । जमा धरी पाप पुण्याची हे ।।
तुकाराम महाराज या अभंगातून स्पष्ट करतात की, माणसाने स्वतःच्या पूर्व कर्मानुसार जे संचित तयार केले आहे त्याप्रमाणेच त्याला फळ भोगावे लागते. आईवडिलांनी कमालवलेले संचित, त्याचे वाटेकरी त्याला होता येत नाही, म्हणून प्रत्येकाने आपापले संचित स्वतः आपल्या चांगल्या कर्मानुसार तयार करावे. प्रत्येक व्यक्तीला माहित असेत त्याचा लाभ कशात आहे त्यानुसार कर्मफळाची आसक्ती न ठेवता कर्म करावे. काळाने आपल्या आयुष्याला एक माप लावलेलं असतं. तुम्ही केलेलं पाप-पुण्य त्याच जमा होतं. शरीर शाश्वत नाही आणि मृत्यू हा अटळ आहे. काळ त्याचे काम करतो. प्रत्येक माणसाच्या पाप -पुण्याचा हिशोब ठेवतो. हे सतत ध्यानात ठेऊनच प्रत्येकाने त्याचे वर्तन ठेवावे.
संत तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठ असून त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. तुकोबांनी समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या संत तुकारामांनी फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठगमन केले.