सरकारी संस्था लेखी माहितीशिवाय कॉल नाही करत
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकात्याच्या लालबाजार पोलिसांनीही या संदर्भात इशारा दिला आहे. पोलीस, केंद्रीय संस्था आणि न्यायालयांच्या नावाने येणारे खंडणीचे कॉल, मेसेज आणि ई-मेल्सबाबत लोकांनी सावध राहावे, असे सांगण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, कोणतीही सरकारी किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था लेखी माहितीशिवाय कॉल किंवा व्हिडिओ कॉल करत नाही.
कॉल्सची करा तपासणी
मोहित शर्मा नावाच्या लिंक्डइन युजरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हॉट्सॲपवर आलेल्या फसवणुकीच्या कॉलचा व्हिडिओ शेअर केला आहे. युजरने सांगितले की, त्याच्या आईला कॉल आला होता. व्हॉट्सॲप कॉलरने सांगितले की, त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. कॉलरने नाव, व्यवसाय यासारखी वैयक्तिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला भावनिक त्रास देण्याचाही प्रयत्न केला. मोहितच्या पोस्टवरून त्याला ही फसवणूक समजल्याचे दिसते. त्यांनी लोकांना अशा कॉल्ससंदर्भात सर्व काही तपासण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस स्टेशनचे डिटेल्स विचारताच कॉल डिसकनेक्ट
यासारख्याच दुसऱ्या एका शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पीडितेला ९२३१२१४१४७४१ या क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला आहे. कॉलर म्हणतो तुझ्या मुलाचे नाव राज? जेव्हा उत्तर होय आले तेव्हा तो सांगतो की, राजला आणखी 4 मुलांसह अटक करण्यात आली आहे. त्याने 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. एवढेच नाही तर राजला फोन करून त्याच्याशी बोलायला लावल्याचा दावाही पोलिस कर्मचाऱ्याने केला आहे. त्या बदल्यात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येतो. आरोप गंभीर असल्याचे कॉलरचे म्हणणे आहे. मीडिया आणि डीसीपीही येणार आहेत. पीडितेला पोलिस ठाण्याचे ठिकाण जाणून घ्यायचे असताना, कॉलरने अस्पष्ट उत्तरे दिली आणि उद्या कोर्टात भेटू, असे सांगून कॉल डिस्कनेक्ट केला.
प्रकारण शांत करण्यासाठी उकळले पैसे
ही पहिलीच घटना नाही, अलीकडेच एका महिला शिक्षिकेने आपल्यासोबत घडलेली घटना सोशल मीडियावर शेअर केली होती.तिलाही असाच फोन आला होता. बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मुलीला अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. महिलेने सांगितले की, कॉलरने तिला एका मुलीशी बोलायला लावले जिचा आवाज अगदी तिच्या मुलीसारखा होता. यानंतर प्रकरण शांत करण्यासाठी कॉलरने महिलेकडून सुमारे 7 हजार रुपये उकळले. ती गोष्टींची पडताळणी करू शकेपर्यंत आधीच आर्थिक नुकसान झाले होते.
प्रोफाईल फोटो पोलिसांचा
विशेष म्हणजे अशा व्हॉट्सॲप कॉलमध्ये फोन नंबरसोबत दिसणारा प्रोफाईल फोटो पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीचा आहे. त्यामुळे कॉल रिसिव्ह करणाऱ्याचाही भीतीमुळे पोलिसांचाच कॉल असण्यावर विश्वास बसत आहे.