भालचंद्र संकष्टी चतुर्थी वेळ आणि चंद्रोदय
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. २८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरु होईल आणि २९ मार्च रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी संपेल. नेहमीप्रमाणे चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जाईल. चंद्रोदयाची वेळ रात्री ९ वाजून २८ मिनिटांची आहे. पंचांगा नुसार भालचंद्र चतुर्थी दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी १० वाजून ५४ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. संध्याकाळी, ५ वाजून ४ मिनिटे ते ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत श्रीगणपतीची पूजा करू शकता.
भालचंद्र संकष्टी चतुर्थी पूजा विधी
भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवार उठून श्रीगणेशाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी. स्नान करून सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर देवघरातील मंदिर स्वच्छ करून एका आसनावर वस्त्र पसरून श्रीगणेशाची मूर्ती त्यावर ठेवावी. गणपतीचे ध्यान करू पुजा सुरु करावी.गणेश स्तोत्र आणि मंत्रांचा जप करा. उपवासाचा संकल्प करा. तुपाचा दिवा लावून गणपती बाप्पाची आरती करावी. गणपतीला मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देऊन आपले व्रत पूर्ण करावे.
भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
हिंदू धर्मात,पुजेचा प्रथम मान गणपतीला दिला जातो. गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेतील संकट तो दूर करतो अशी जनमानसात धारणा आहे. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते असेही म्हणतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपतीला समर्पित आहे. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील रखडलेली कामे पूर्ण होतात तसेच सुख, समृद्धी मिळते अशी धारणा आहे. असे मानले जाते की भालचंद्र संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या 12 नावांचे स्मरण केल्यास जीवनातील दुःख कमी होतात. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, धुम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन ही ती नावे आहेत.