हायलाइट्स:
- सख्ख्या भावांच्या साक्षीसाठी संशयाचा चष्मा आवश्यक नाही.
- मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे महत्त्वाचे निरीक्षण.
- आरोपीवरील खूनाचा आरोप अमान्य करत शिक्षेत केली घट.
नागपूर:साक्षीदार हे केवळ मृत व्यक्तीचे सख्खे भाऊ आहेत म्हणून त्यांच्या साक्षीकडे संशयाच्या चष्म्यातून बघायलाच हवे असे नाही, असे मत नोंदवित मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका आरोपीला दोषी ठरविले व त्याला शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्याच्यावरील खूनाचा आरोप अमान्य करीत त्याच्या शिक्षेत घट करण्यात आली आहे. ( High Court Order In Murder Case )
वाचा: पत्नीचे लव्ह अफेअर पतीला भोवले! आधी वाटलं आत्महत्या असावी पण…
न्या. व्ही. एम. देशपांडे आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. गोपाळ जानराव सरप (वय ३०, रा. चिखलगाव, अकोला) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून मुकेश मधुकर पेंढारकर असे मृताचे नाव आहे. गोपाळवर मुकेशची हत्या, मुकेशची आई सुनंदा यांच्यावर प्राणघातक हल्ला तसेच मुकेशचा परीचित विलास वानखेडे याच्यावर किरकोळ हल्ला केल्याचा आरोप होता. याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०७ आणि ३२४ अन्वये गुन्हे दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. अकोला सत्र न्यायालयाने त्याला तिन्ही गुन्ह्यांत दोषी ठरविले आणि खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याने या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. त्याने सुनंदा आणि विलासवर केलेल्या हल्ल्याचे पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले असल्याचे नोंदवित हायकोर्टाने त्याची या दोन्ही गुन्ह्यांमधून निर्दोष सुटका केली. तसेच खूनाच्या आरोपातही त्याच्याविरुद्ध मृत मुकेशचे सख्खे भाऊ मनोज आणि सतीष यांची साक्ष नोंदविण्यात आली. मुकेशने त्यांना दिलेली माहिती हा त्याचा मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरण्यात आला.
वाचा: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अखेर जामीन; अर्जात केला ‘हा’ दावा
सख्ख्या भावांची साक्ष गृहित धरली जाऊ नये, असा युक्तिवाद बचावपक्षाने केला. परंतु, केवळ ते सख्खे भाऊ आहेत म्हणून त्यांनी दिलेल्या साक्षीकडे एका रंगीत चष्म्यातून बघून त्यावर संशय घेतला जाऊ शकत नाही. त्यांनी दिलेल्या साक्षीवर संशय घ्यावा असे सुनावणी दरम्यान काहीच समोर आले नाही, त्यामुळे त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाऊ शकते, असा निर्वाळा देत गोपाळला मुकेशच्या मृत्यूस कारणीभूत ठरविण्यात आले. परंतु, त्याच्या कृतीमागील उद्देश हा खूनाचा नसल्याचे सिद्ध झाल्याने त्याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात आली. त्याने २०१३ पासून आजवर भोगलेली शिक्षा पुरेशी असल्याचे सांगत न्यायालयाने त्याची सुटका करण्याचे आदेश दिलेत.
वाचा: नगर जिल्ह्यात दुर्घटनांची मालिका; शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू