अश्लील शिवीगाळीचे व्हिडिओ करायचा व्हायरल; पोलिसांनी ‘असा’ दिला दणका

हायलाइट्स:

  • अश्लील शिवीगाळ असलेले व्हिडिओ करायचा व्हायरल
  • कर्जतमधील भामट्याला पोलिसांनी दिला मोठा दणका
  • आरोपीविरुद्ध आधीपासूनच दाखल आहेत अनेक गुन्हे

अहमदनगर: गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेला तरुण गावात ग्रामस्थ आणि महिलांसाठी त्रासदायक बनला होता. तो प्रत्यक्ष त्रास तर देत होताच, शिवाय स्वत:चे अश्लील शिवीगाळ करणारे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करीत असे. मात्र, त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास कोणी धजावत नव्हते. अखेर कर्जत पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी या तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध सामाजिक शांतता बिघडविल्याचा आरोप करून कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला आठ दिवस स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली. भविष्यातील गंभीर गुन्ह्यांना अटकाव करण्याच्या उद्देशाने ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Karjat Police arrested man for making objectionable video)

वाचा: एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले!

कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर या गावातील ही घटना आहे. तेथे सचिन विठ्ठल आडागळे (वय २७) हा महिला आणि ग्रामस्थांना त्रास देत होता. त्याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाणे तसेच पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यातही विविध गुन्हे दाखल आहेत. जामिनावर असताना तो गावात अशी गैरकृत्ये करीत होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथक पाठवून त्याला अटक केली. त्याच्याकडून भविष्यात गंभीर गुन्हे घडू नयेत, याची दक्षता म्हणून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी आडागळे याला आठ दिवस स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. त्याच्या त्रासापासून काही काळ तरी सुटका झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

वाचा: राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेल्या उत्तराची देशभर चर्चा; असं काय आहे पत्रात?

यासंबंधी पोलिस निरीक्षक यादव यांनी सांगितले की, महिलांना त्रास देण्याच्या अशा प्रकारातून पुढे गंभीर गुन्हे घडू शकतात. त्यामुळे गावकऱ्यांकडून यासंबंधी तक्रार येताच पोलिसांनी गांभीर्याने घेत कारवाई केली. तांत्रिकदृष्ट्या त्याच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करणे शक्य नव्हते. त्यामुळे भविष्यातील त्याच्या गुन्ह्यांना वेळीच अटकाव घातला जावा, यासाठी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अन्य गावांतही अशा त्रासदायक व्यक्तींसंबंधी ग्रामस्थांनी धाडसाने पुढे येऊन तक्रार करावी, माहिती द्यावी. पोलिस नक्कीच योग्य ती कारवाई करतील, असे आवानही यादव यांनी केले आहे.

Source link

Ahmednagar Crime Newskarjat policeobjectionable videoअहमदनगरकर्जतकर्जत पोलीस
Comments (0)
Add Comment