गुढीपाडवा शुभमुहुर्त
यंदा गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ (मंगळवार) रोजी साजरा करण्यात येणार आहे. चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिलला (सोमवारी) रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होणार असूनन दुसऱ्या दिवशी ९ एप्रिलला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होणार आहे. मंगळवारी ९ तारखेला सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत पुजेची शुभ वेळ आहे. यामध्ये सकाळी ६ वाजून २० मिनिटे ते ६ वाजून २७ मिनिटे हा सर्वोत्तम कालावधी आहे असे पंचागानुसार सांगितलेले आहे. या शुभ मुहुर्तावर गुढीची पुजा करून तुम्ही गुढी उभारू शकता. घरोघरी गुढी उभारून पुरळणपोळी, श्रीखंड पुरी, आमरस पुरी असा नैवेद्य दाखवला जाईल. उत्तम आरोग्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी ज्याला काही ठिकाणी कडुलिंबाचे चुर्ण असे म्हणतात ते खाण्याची ही परंपरा आहे.
गुढी कशी उभारावी?
गृहिणी अंगण झाडून स्वच्छ करतात, त्यावर सडा शिंपतात व सुंदर रांगोळी काढतात. त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते. बांबूची उंच काठी रंगीत खणाने किंवा वस्त्राने शृंगारतात. त्यावर चांदीचे किंवा तांब्या-पितळेचे पात्र ठेवले जाते. त्या तांब्याच्या कलशावर स्वस्तिक असावे. त्यानंतर हार, गाठी, कडुलिंबाची डहाळी त्याला लावली जाते. अशा तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात उभारतात. गुढी उभारताना तीन गोष्टी लक्षात ठेवा. सुर्योदयानंतर लगेचच उभारावी. जमीनीवर पाट ठेवून गुढी थोडी कललेल्या स्थितीत उभारावी. तांब्याच्या कलशावर स्वस्तिक काढून तो गुढीवर उपडा ठेवावा.
गुढीपाडवा साजरा करण्याचा उद्देश
शास्त्रात असे म्हटले आहे की होळीच्या काळात भेदभाव टाकून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते. ही अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसापासून पुन्हा नव्याने सुरूवात करून आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा. अंगणात किंवा खिडकीत उभारलेली ती गुढी जणू काही सांगत असते, नवीन वर्ष सुरू झालंय. नवा विचार करा. सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. सदैव तुमची प्रगती होवू दे.