हायलाइट्स:
- हत्येच्या गुन्ह्यात ११ महिन्यांनी मिळाला जामीन
- घरी पोहोचण्याआधीच तरुणाची हत्या
- बदला घेण्यासाठी गोळीबार केल्याची शक्यता
जळगाव : हत्येच्या गुन्ह्यात ११ महिन्यांनी जामीन मिळाल्यानंतर वडिलांसोबत घरी जात असलेल्या तरुणावर ६ जणांनी मिरचीपूड फेकून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर त्याच्या वडिलांवर चॉपरने हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता नशिराबाद गावात उड्डाणपुलाच्या खाली घडली.
धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय १९, रा. पंचशिलनगर, भुसावळ) असं मृत तरुणाचं नाव आहे, तर त्याचे वडील मनोहर दामू सुरळकर हे गंभीर जखमी आहेत.
भुसावळ शहरातील पंचशील नगरात दोन गटात सतत वाद होत होते. फेब्रुवारी २०२० मध्ये मोहम्मद कैफ शेख जाकीर (वय १७) याचा धम्मप्रिय सोबत वाद झाला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धम्मप्रियवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर ११ ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा हा वाद उफाळून आला. यावेळी धम्मप्रिय याच्यासह समीर उर्फ कल्लु अजय बांगर (वय १८), आशिष उर्फ गोलू अजय बांगर (वय २१) व शुभम पंडीत खंडेराव (वय १८) या चौघांनी मोहम्मद कैफ याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा खून केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चारही संशयितांना अटक करण्यात आली होती.
यातील धम्मप्रिय याला मंगळवारी भुसावळ न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. जामिनाचे कागदपत्र घेऊन त्याचे वडील मनोहर सुरळकर व तीन मित्र असे चार जण सायंकाळी पाच वाजता जळगावच्या कारागृहात पोहोचले. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास चौघेजण धम्मप्रिय याला घेऊन भुसावळकडे निघाले. यावेळी दोन दुचाकीवरुन पाच जण निघाले होते. नशिराबाद गावातील पुलाखाली सिगारेट ओढण्यासाठी सर्व पाचही जण थांबले. नेमके याचवेळी तीन दुचाकीवरुन सहा तरुण त्यांच्यामागे आले.
काही कळण्याच्या आतच दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी धम्मप्रिय व त्याच्या वडीलांच्या डोळ्यात मिरचीपुड फेकली. यामुळे त्यांना काहीच कळाले नाही. दोन तरुणांनी पिस्तुल काढून गोळीबार सुरू केला. यात धम्मप्रियच्या छातीत व डोक्यात गोळी शिरली. जीव वाचवण्यासाठी तो काही अंतर पुढे पळाला परंतु मारेकऱ्यांनी चॉपरने वार करुन त्याला ठार केले. तर त्याच्या वडिलांवरही चॉपरले हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. अवघ्या मिनिटभरात घडलेल्या या थरारानंतर मोरकरी घटनास्थळावरुन पळून गेले. तर सुरळकर पिता-पुत्रासोबत असलेले तीघे जण देखील भयभीत होऊन घटनास्थळाहून पळून गेले होते.
समीर व जाकीर यांना अटक
घटनेनंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास समीर व जाकीर नावाच्या दोन तरुणांना नशिराबाद, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील समीर हा मोहम्मद कैफ याचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.