हायलाइट्स:
- राज्यात पुन्हा एकदा शिवसेना- भाजप सामना रंगणार
- सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर टीका
- चंद्रकांत पाटलांनी दिले प्रत्युत्तर
मुंबईः भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) राज्य सरकारवर पुन्हा एकदा आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरुद्ध भाजप संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेनेनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यावर सामनात अग्रलेख लिहला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेला पत्र लिहित खणखणीत उत्तर दिलं आहे.
सामनाच्या संपादकीयमध्ये चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला लिहलेलं पत्र जाहीर करण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या अग्रलेखावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया आज जशीच्या तशी सामनात्या संपादकीयमध्ये छापण्यात आली आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगणार का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाचाः राजभवन हे भाजप कार्यालय!; मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर पटोले म्हणाले…
‘तुम्ही माझ्यावर या अग्रलेखात बरीच चिखलफेक केली. पण तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या बरोबरी नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. नुकतेच मी एका नेत्याबद्दल पाठीत खंजीर खुपसला असा वाक्यप्रचार वापरला तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला माहिती नाही. त्यामुळं प्रोटोकॉल शब्द का वापरला हे सांगितलं. विशेष म्हणजे तुमच्या पक्षाचे माजी मंत्री अनंत गीते यांनीही हाच वाक्यप्रचार वापरला. मी हा वाक्यप्रचार वापरल्यानंतर तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते,’ असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
वाचाः CM ठाकरे-अमित शहा यांची दिल्लीत होणार भेट!; तर्कवितर्कांना उधाण
चंद्रकांत पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला होता. त्यावरही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. ‘मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावर मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला. पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच,’ असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
वाचाः राष्ट्रवादीच्या नेत्यांना जावयांमुळे ‘सासूरवास’; आता मुश्रीफ अडचणीत!