हायलाइट्स:
- कोकणवासियांची चिंता वाढवणारी बातमी
- कोकणात गेलेल्या भाविकांना करोनाची लागण
- कोकणात गेलेल्या २७२ जणांना करोना
मुंबईः गौरी गणपतीच्या सणासाठी मुंबईबाहेर गेलेले भाविक आता परतत आहे. मात्र, गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर व अन्य भागातून कोकणात गेलेल्या गणेशभक्तांपैकी २७२ जणांना करोनाची लागण झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयानं ही माहिती दिली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अनेक चाकरमान्यांनी गावी धाव घेतली होती. यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नियम कठोर करण्यात आले होते. मुंबई, पुणे, ठाण्यातून कोकणात जाण्यासाठी एसटी व मध्य व पश्चिम रेल्वेनं जादा गाड्यादेखील सोडल्या होत्या. तसंच, खासगी बस व वाहनांमधूनही मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. यंदा रत्नागिरीत एक लाख ३० हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८७ हजार ८३७ जण दाखल झाले होते.
वाचाः राज्यसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली?
गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या अनेकांची करोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये २७२ जणांना करोना झाल्याचे निदान झाले आहे. त्यामध्ये रत्नागिरीत १२० तर सिंधुदुर्गात १५२ रुग्ण आढळून आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्यानं कोकणवासियांची चिंता वाढली आहे. सध्या काही रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. यंदा गणेशोत्सवानिमित्त जवळपास दोन लाख १७ हजारांहून अधिक गणेशभक्त कोकणात दाखल झाले होते. त्या तुलनेत करोनाबाधितांचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले.
वाचाः राज्यात करोनाचा ग्राफ येतोय खाली; मुंबई, पुण्यातून दिलासा देणारी बातमी
परतलेल्या भाविकांच्या चाचण्या
राज्यामध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना, एकीकडे लसीकरण वेगाने होत असले, तरीही रुग्णसंख्या नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मुंबईमध्ये करोना चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. गौरीगणपतीच्या सणासाठी मुंबईबाहेर गेलेले भाविक आता मुंबईत परतत आहेत. परतणाऱ्या मुंबईकरांनी करोना चाचण्या करून घ्याव्यात, या उद्देशाने ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. बसस्टँड तसेच रेल्वे स्थानके, उद्याने तसेच सार्वजनिक ठिकाणी या चाचण्या करण्यात येत आहेत.
वाचाः CM ठाकरे-अमित शहा यांची दिल्लीत होणार भेट!; तर्कवितर्कांना उधाण