चंद्रकांत पाटील म्हणतात, ही तर यूपीची निवडणूक जिंकण्याची एक पायरी!

मुंबई: काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी भारतीय जनता पक्षानं संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली असून त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. चंद्रकांत पाटील यांनी उपाध्याय यांच्या उमेदवारीचा संबंध थेट उत्तर प्रदेशच्या निवडणुकांशी जोडला आहे.

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचं अलीकडंच करोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी काँग्रेसनं सोनिया गांधी यांच्या विश्वासू रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपनं मुंबई विभागीय सरचिटणीस संजय उपाध्याय यांना मैदानात उतरवलं आहे. उपाध्याय यांनी आज अर्ज भरल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला.

संजय उपाध्याय यांची उमेदवारी हा भाजपसाठी शुभशकुन असल्याचं पाटील म्हणाले. भाजपच्या १२ निलंबित आमदारांना राज्यसभा पोटनिवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळं भाजपचं संख्याबळ कमी करून निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आहे. हा एक शुभशकुन आहे. दुसरं म्हणजे, संजय उपाध्याय यांच्या वडिलांचं नाव ‘रामभक्त’ आहे. त्याच्या वडिलांनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं आहे. राम मंदिरासाठी निधी संकलन सुरू झाल्यानंतर त्यांनी पहिली पावती फाडली आहे. अशा या एका रामभक्ताचा मुलगा राज्यसभेवर जाणं हे आमच्यासाठी भूषणावह आहे. संजय उपाध्याय यांचं राज्यसभेवर निवडून जाणं हे उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी ज्या अनेक पायऱ्या आहेत, त्यासाठी उपयुक्त ठरेल,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Source link

Chandrakant Patil on Rajya Sabha BypollRajya Sabha Bypoll 2021Sanjay Upadhyay Files Nominationचंद्रकांत पाटीलसंजय उपाध्याय
Comments (0)
Add Comment