इस्रायलने काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये इराणी लष्कराच्या तीन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना मारल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव विकोपाला गेला आहे. याच सूडनाट्याची नांदी म्हणावी, अशा रीतीने इराणने शनिवारी इस्रायली व्यक्तीच्या कंपनीच्या मालकीचे जहाज होर्मुझच्या आखातात ताब्यात घेतले. इराणी नौदलाचे कमांडर हेलिकॉप्टरद्वारे या जहाजावर उतरले आणि त्यांनी या जहाजाचा ताबा घेतला.
या घटनेवर इस्रायलने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला दहशतवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’ला पाठबळ देणारा इराण हा गुन्हेगार देश आहे. आता त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करून खासगी मोहीम राबवली आहे,’ असे इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल केट्झ यांनी म्हटले आहे.
का पकडले जहाज?
– इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘आयआरएनए’ने म्हटले आहे, की इराणी नौदलाच्या कमांडरनी पोर्तुगीज ध्वज असलेल्या ‘एमएससी अराइज’ या जहाजावर हल्ला केला.
– हे कंटेनरवाहू जहाज लेबनॉनमधील झोडियाक मेरीटाइम या कंपनीच्या मालकीचे आहे. ही कंपनी इस्रायली अब्जाधीश आयाल ओफर यांच्या झोडियाक समूहाच्या मालकीची आहे. जहाज ताब्यात घेण्याच्या घटनेवर ‘झोडियाक’ने प्रतिक्रिया दिली नाही.
– जीनिव्हा येथील एमएससी कंपनीने जहाज पकडले गेल्याच्या आणि त्यावर २५ कर्मचारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
– पकडल्यानंतर हे जहाज इराणच्या सागरी हद्दीत नेण्याचे नियोजित होते, असे ‘आयआरएनए’ने म्हटले आहे.
– पकडलेले जहाज संयुक्त अरब अमितीतील फुजियाराह बंदरातून निघाले होते, अशी माहिती ब्रिटिश गुप्तहेर संस्थांनी दिली.
इराणने पकडलेल्या जहाजावर १७ भारतीय नागरिक असल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांच्या मुक्ततेसाठी इराणबरोबर बोलणी सुरू आहेत. राजनैतिक मार्गाने भारत आणि इराण यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत.- भारतीय परराष्ट्र मंत्रालय
विमानसेवा बंद
– एअर इंडियाने इराणला जाणारी विमानसेवा थांबवली आहे
– लुफ्तान्सा या जर्मन विमान कंपनीनेही फ्रँकफर्ट आणि तेहरान दरम्यानची विमानसेवा थांबवली आहे
– डच विमान कंपनी केएलएमने इराण आणि इस्रायल दोन्ही देशांच्या हवाई क्षेत्राचा वापर थांबवला आहे. मात्र, तेल अवीवहून विमाने उड्डाण करतील, असे म्हटले आहे.
पडघम सशस्त्र संघर्षाचे
– हिज्बुल्ला या लेबनॉनस्थित दहशतवादी संघटनेने इस्रायलवर काही क्षेपणास्त्रे डागली.
– हिज्बुल्लाने ४० क्षेपणास्त्रे डागल्याचा इस्रायलचा दावा
‘इराणकडून लवकरच हल्ला’
वॉशिंग्टन : सध्या गाझा पट्टी आणि पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष पाहता इराण अपेक्षेपेक्षा लवकर इस्रायलवर हल्ला करील, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. मला संरक्षणविषयक तपशील फार जाहीर करायचे नाहीत. मात्र, माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर हल्ल्याला तोंड फुटेल, असे बायडेन यांनी पत्रकारांना सांगितले. इराणला काही संदेश दिला का, या प्रश्नावर बायडेन यांनी नकारार्थी उत्तर दिले. मात्र, इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो, अशी अत्यंत विश्वासार्ह माहिती मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
इस्रायलचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचा इस्रायलला पाठिंबा आहे. त्यांना स्वरक्षणात आम्ही मदत करू आणि इराण कधीही यशस्वी होणार नाही.- जो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका