‘पूर्वांचल फॅक्टर’ असणार महत्वाचे!
उत्तर पूर्व दिल्लीतील पूर्वांचल भागातील म्हणजे बिहार आणि उत्तरप्रदेश भागातील मतदार जास्त आहेत. हेच लक्षात ठेवून कॉंग्रेस आणि भाजपाने उमेदवार सुद्धा पूर्वांचलमधले दिले आहेत. या मतदारसंघात पूर्वांचल भागातील जवळपास २८% मतदार आहेत. हीच आकडेवारी पाहून भाजपने गेल्यावेळच्या ७ विद्यमान खासदारांपैकी ६ खासदारांचे तिकीट कापले पण मनोज तिवारींची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. कॉंग्रेसकडूनही या मतदारसंघात मतदारांचा ‘पूर्वांचल फॅक्टर’ पाहून कन्हैया कुमारला उमेदवारी दिल्याचे बोलले जातेय.
पक्षनेतृत्वाचे आडाखे काय?
कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातून येतो तर मनोज तिवारी बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून येतात. या मतदारसंघात बिहारच्या बेगुसरायमधील अंगिका आणि मगही या भाषा बोलल्या जातात. त्यामुळे त्यांची मते कन्हैया मिळवू शकतो तर मनोज तिवारी भोजपुरी पट्ट्यातून येत असल्याने त्यांची मते मनोज तिवारी मिळवू शकतात, असे एकंदर पक्षनेतृत्वाचे आडाखे आहेत.
काय आहेत जातीय समीकरणे?
उत्तर पूर्व दिल्ली भागात २१% मुस्लीम, १६.३% दलित, ११.६१% ब्राह्मण, वैश्य ४.६८%, पंजाबी ४ %, गुर्जर ७.५७% तसेच ओबीसी मतदारांची संख्या २१ टक्के आहे. या मतदारसंघातील ७ विधानसभा आम आदमी पार्टीच्या ताब्यात आहेत तर ३ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. कॉंग्रेसने दलित, मुस्लीम, ओबीसींची मोट बांधायला सुरूवात केली आहे. या मतदारसंघात दलित, मागास, अल्पसंख्यांक आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने याचा फायदा कन्हैया कुमारला होण्याची शक्यता आहे. कारण कन्हैया आपल्या भाषणात याच वर्गांचे मुद्दे नेहमी मांडून त्यांच्या काळजात हात घालण्याचा प्रयत्न करतो.
गत लोकसभेत कन्हैयाचा पराभव
गत लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये कन्हैया कुमारने सीपीआयकडून बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपच्या गिरिराज सिंह यांनी कन्हैयाचा सुमारे ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. निवडणुकीनंतर कन्हैयाने काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकीर्दीचा नवा प्रवास सुरू केला.