महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आता नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली अत्यंत महत्त्वाची मागणी

हायलाइट्स:

  • राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
  • राज्यपालांनंतर आता नाना पटोले यांचंही मुख्यमंत्र्यांना पत्र
  • सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी

मुंबई: राज्यातील महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर राज्यात हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राज्यपालांचे पत्र व त्यास मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. (Nana Patole Writes To CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पटोले यांनी साकीनाका येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. ‘साकीनाक्यातील घटना पाहता महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सर्वत्र पुरुष सुरक्षा रक्षकच दिसतात, त्यांच्यासोबतच महिला सुरक्षा रक्षकही तैनात करावेत, अशी मागणी पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वाचा: निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल; राष्ट्रवादीचा आमदार गोत्यात

‘महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महाराष्ट्र व मुंबईचा नावलौकिक कमी होणार नाही यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याबाबत निर्णय घ्यावा. असा निर्णय झाल्यास महिला सुरक्षेच्या दृष्टीने ते आणखी महत्वाचे पाऊल ठरेल. महिलांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी दिशादर्शक राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक आहे. हा निर्णय झाल्यास देशातील इतर राज्यांनाही तो मार्गदर्शक ठरेल. महिलांच्या सुरक्षेचा विचार करता या मागणीवर आपण गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, असं पटोले यांनी पत्रात नमूद केलं आहे.

वाचा: करोना हटेना! ‘या’ तालुक्यात पुन्हा कडक लॉकडाउन लावण्याची वेळ

Source link

Nana PatoleNana patole Writes To CM Uddhav ThackerayUddhav Thackerayउद्धव ठाकरेनाना पटोलेनाना पटोले यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Comments (0)
Add Comment