२०१९च्या लोकसभा निवडणुकीत १२ मे रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी ६०.६ टक्के होती. २०१४च्या तुलनेत ती साडेचार टक्क्यांनी कमी होती. या वेळी २५ मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. तेव्हाही येथे ज्येष्ठातील भीषण उन्हाळा असेल.
आणीबाणीनंतर १९७७ मधील निवडणुकीत दिल्लीत विक्रमी म्हणजे ७१.३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या ११ निवडणुकांमध्ये दिल्लीला या आकड्याला स्पर्श करता आलेला नाही.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्लीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत दिल्लीच्या सातही मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर वाढीव सुविधा देण्याच्या त्रिस्तरीय धोरणावर भर देण्यात आला. मतदारांचा वाढता सहभाग, रांगांचे व्यवस्थापन, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप, किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि गर्दीच्या ठिकाणी योग्य पार्किंग उपलब्ध करून देणे याबाबत बैठकीत चर्चा झाली. दिल्लीतील प्रतिष्ठित नागरिक व प्रभावशाली तरुणांच्या सहभागातून जनजागृती करण्यात येणार आहे. बूथनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
चांदनी चौक अव्वल
सात लोकसभा जागांपैकी चांदनी चौक लोकसभा मतदारसंघात तीन निवडणुका वगळता प्रत्येक वेळेस तुलनेने सर्वाधिक मतदान झाले आहे. चांदनी चौक मतदारसंघ १९६७मध्ये अस्तित्वात आला. त्या वर्षी तेथे ६८.७९ टक्के मतदान झाले, हे दिल्लीतील सर्वाधिक मतदान होते. १९७७मध्ये चांदनी चौक मतदारसंघात ८२.९८ टक्के मतदानाचा विक्रम झाला, तो आजही अबाधित आहे. दक्षिण दिल्लीत एका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढते आणि पुढच्या निवडणुकीत ती झपाट्याने कमी होते, असा इतिहास आहे. २०१९च्या निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत चार टक्क्यांनी कमी, म्हणजे जेमतेम सुमारे ५८ टक्के मतदान झाले होते. नवी दिल्लीतील चित्रही फारसे वेगळे नाही.