आधीच गाझा पट्टीतील युद्धावरून पश्चिम आशियामध्ये तणाव आहे. इस्रायलने एक एप्रिल रोजी इराणच्या सीरियातील वाणिज्य दूतावासावर हल्ला केला. त्यात इराणच्या काही अतिवरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यावरून, इराणकडून संतप्त झाला आहे. इस्रायलला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना पश्चिम आशियात प्रवास न करण्याच्या सूचना केल्या आहेत.
अमेरिका, फ्रान्सचाही इशारा
इराण हल्ल्याच्या तयारीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना पश्चिम आशियात न जाण्याचा इशारा जारी केला आहे. यात फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, रशिया, जर्मनी, ब्रिटन आदींचा समावेश आहे. जर्मन एअरलाइन ‘लुफ्तान्सा’ने इराणला जाणारी-येणारी विमाने शनिवारपर्यंत स्थगित केली आहेत. अमेरिकेने आपल्या दूतावासातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तेल अविव, जेरुसलेम व बीरशेबा शहर न सोडण्याचा आदेश दिला आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या नागरिकांना इराण, इस्रायल, लेबॅनॉन आणि पॅलेस्टिनी प्रदेशामध्ये जाणे पूर्ण टाळावे, असे म्हटले आहे.
सर्व आघाड्यांवर संघर्ष
– ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी सात ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर, इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील युद्धाला सुरुवात झाली.
– लेबनॉनमधील ‘हिज्बुल्ला’ही ‘हमास’च्या बाजूने उतरली असून, त्यांच्या दहशतवाद्यांकडून इस्रायलवर हल्ले केले आहेत.
– इराणचा पाठिंबा असणाऱ्या हुती दहशतवाद्यांच्या संघटनेने एडनच्या आखातामध्ये आंतरराष्ट्रीय जहाजांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अमेरिका, भारतासह अनेक देशांचे नौदल प्रयत्नशील आहे.
– इराणचा ‘हमास’ला पाठिंबा असून, गाझा पट्टीतील नागरिकांच्या बळीविरोधात इस्रायलला धडा शिकवण्याचा इशारा इराणने दिला आहे.
पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, भारतीय नागरिकांनी पुढील सूचना येईपर्यंत इराण किंवा इस्रायलमध्ये जाऊ नये. या दोन्ही देशांतील भारतीयांनी दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि स्वत:ची माहिती नोंदवावी. सुरक्षेच्या दृष्टीने खूप काळजी घ्यावी आणि अत्यावश्यक काम नसल्यास घरातून बाहेर पडणे टाळावे.- परराष्ट्र मंत्रालय