वृत्तसंस्था, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने माहितीच्या अधिकारांतर्गत मागण्यात आलेली माहिती न दिल्याबद्दल केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्होटर्स व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेलच्या (व्हीव्हीपॅट) विश्वासार्हतेविषयी प्रतिष्ठित नागरिकांनी सादर केलेल्या अहवालावर केलेल्या कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाकडे या अर्जात तपशील मागण्यात आला होता. निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट आणि मोजणी प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत काहींनी अहवाल सादर केला होता. त्यावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये माजी आयएएस अधिकारी एम. जी. देवसहायम यांचाही समावेश होता.२ मे २०२२ रोजी हा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर सदर अहवाल कोणत्या व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना पाठवला गेला, याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी देवसहायम यांनी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. या मुद्द्यावर झालेल्या कोणत्याही बैठकीचा तपशील आणि संबंधित फाइल ‘नोटिंग’ची माहितीही त्यांनी यात मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाने देवसहायम यांच्या अर्जाला प्रतिसाद दिला नाही. तसेच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या पहिल्या अपिलावर सुनवणीदेखील घेण्यात आली नाही.