हायलाइट्स:
- सोमय्या पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर
- कागल पोलीस ठाण्यात तक्रार देणार
- हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढणार?
कोल्हापूर : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज साखर कारखान्याच्या घोटाळ्यासंदर्भत कागल पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत. यापूर्वी सोमवारी २० सप्टेंबर रोजी सोमय्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखले होते. सोमय्या परत कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याने पुन्हा राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी खासदार सोमय्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर घोरपडे आणि गडहिंग्लज कारखान्यातील आर्थिक घोटाळ्यासंदर्भात आरोप केले आहेत. ते २० सप्टेंबरला कोल्हापुरात येणार होते. पण अनंत चतुर्दशीदिवशी सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाचे कारण दाखवत पोलिसांनी सोमय्यांना कोल्हापूर बंदीचा आदेश बजावला होता. तरीही सोमय्या मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूराकडे येत होते. मात्र सोमवारी पहाटे त्यांना कराड येथे रोखण्यात आले होते. त्यानंतर सोमय्यांनी परत कोल्हापुरात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना आज बुधवारी पत्र पाठवले असून त्यामध्ये कागल पोलीस ठाण्यात मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यास येत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यात घोरपडे आणि गडहिंग्लज साखर कारखान्यातील आर्थिक घोटाळ्यासंदर्भत तक्रार व पुरावे द्यायचे असून त्यावर एफआयआर व्हायला हवी, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात सकाळी सोमय्या करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत.
मंगळवारी सकाळी साडेसात वाजता सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसने येणार असून ते संताजी घोरपडे कारखान्याला बाहेरुन भेट देणार आहेत. तसंच दुपार १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत. त्यानंतर ते भाजपच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुन्हा रात्री सव्वा आठ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.