आम्ही या महिन्याच्या (एप्रिल) शेवटच्या आठवड्यात सुनावणी करू, असे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या दीपांकर दत्त यांच्या खंडपीठाने सांगितले. दुसरीकडे, राऊज एव्हेन्यू जिल्हा न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली. ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. २२ मार्च रोजी त्यांना राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर केले होते. अटक आणि कोठडी यांना आव्हान देणारी केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने नऊ एप्रिल रोजी फेटाळली होती.
केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्यासाठीच त्यांना अटक केली आहे, ही अटक सामान्य नाही, कारण केजरीवाल यांचे नाव आरोपपत्रात नाही असा युक्तिवाद त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ताज्या सुनावणीत केला. ‘मला काही आश्चर्यकारक व धक्कादायक घटना न्यायालयासोमोर मांडायची आहे,’ असे सिंघवी यांनी सांगितल्यावर, ‘आम्हाला नोटीस बजावू द्या, असे न्यायालयाने सांगितले. शक्यतो या शुक्रवारीच सुनावणीची तारीख देण्याची सिंघवी यांची मागणी नामंजूर करताना न्यायालयाने सांगितले, की आम्ही तुम्हाला जवळची तारीख देऊ शकतो; पण तुम्ही सुचवलेली तारीख मिळणार नाही. ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.
‘सरकार तुरुंगातूनच’
दिल्ली सरकार तुरुंगातून चालणार, याचा पुनरूच्चार ‘आप’चे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व पाठक यांनी सोमवारी अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, ‘प्रत्येक आठवड्यात दिल्लीचे दोन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटतील. केजरीवाल यांनी ‘आप’च्या आमदारांना २४ तास जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा संदेश दिला आहे. ते पुढील आठवड्यापासून तिहारमध्येच दोन-दोन मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.’ दिल्लीचे सुपुत्र केजरीवाल यांना स्वतःची नाही, तर दिल्लीच्या जनतेचीच चिंता आहे, असे सांगून पाठक म्हणाले की ‘माझी काळजी करू नका, मी संघर्षासाठी तयार आहे,’ असा संदेशही केजरीवाल यांनी आमच्याशी बोलताना दिला. ‘आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही सत्य आणि प्रामाणिकपणे लोकशाही वाचवण्यासाठी धडपडत आहोत व शेवटी सत्याचाच विजय होईल,’ असाही विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.