‘प्राण जाए पर… वचन न जाए’ ही परंपरा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धतेची ग्वाही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘राजकारण्यांनी एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारावी. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ ही आपली परंपरा आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मी जे बोलतोय ती माझी जबाबदारी आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यासोबत जी आश्वासने माझ्या पक्षाने दिली ती पूर्ण झाली आहेत. यंदाच्या निवडणुकीतही जे सांगत आहे त्यासाठी वचनबद्ध आहे,’ असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ‘एएनआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोदी बोलत होते.

विकसित भारताचे उद्दिष्ट

‘यंदाची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मी कामाला लागलो असून, सन २०४७ मध्ये विकसित भारत कसा असेल याबाबत काम सुरू केले आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्पष्ट केले. मी गेल्या दोन वर्षांपासून सन २०४७ डोक्यात ठेवून काम करतोय. त्यासाठी देशभरातील लोकांच्या सूचना मागवल्या असून, येणाऱ्या २५ वर्षांत भारत कसा पाहिजे यावर नागरिकांचे म्हणणे विचारात घेतले आहे, असेही मोदी म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करील, अशी भीती पसरवणाऱ्या विरोधकांना पंतप्रधानांनी लक्ष्य केले. ‘जेव्हा मी म्हणतो, की माझ्याकडे मोठी योजना आहे, तेव्हा त्यामागे काही आधार असतो. कोणीही कोणत्याही परिस्थितीत घाबरू नये. मी कुणाला घाबरवण्यासाठी किंवा पळवून नेण्यासाठी निर्णय घेत नाही. मी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेतो. मी प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या देशाच्या अनेक गरजा आहेत. मी प्रत्येक कुटुंबाची स्वप्ने कशी पूर्ण करीन, याचाच विचार करीत आहे. हा एक ट्रेलर आहे, अद्याप बरेच काही बाकी आहे. मी बराच काळ गुजरातचा मुख्यमंत्री राहिलो आहे. त्या वेळी माझ्या राज्यातून ३०-४० वरिष्ठ चांगले अधिकारी पर्यवेक्षक म्हणून, निवडणुकीच्या कामासाठी जात असत. त्यामुळे ते ४०-५० दिवस बाहेर राहत असत. सरकार कसे चालवायचे याची चिंता मला सतावत असे. कारण देशात अशा निवडणुका होतच राहतात आणि माझे निरीक्षक जात राहतात. मी या अधिकाऱ्यांना आधीच त्यांचे काम काय आहे, हे सांगत असे. पुढील १०० दिवसांचे प्लॅनिंग कसे करायचे यासाठीचे नियोजन मी तयार करीत असे. सन २०४७ मधील विकसित भारतासाठी आतापासूनच काम करायची गरज आहे.’

निवडणूक रोख्यांबाबत…

निवडणूक रोख्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदी म्हणाले, ‘जर निवडणूक रोखे नसते तर अशी कोणती व्यवस्था होती, की कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे कळले असते? या देशात तीन हजार कंपन्यांनी निवडणूक रोखे दिले आहेत. यातील २६ कंपन्या अशा आहेत, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. यातील १६ कंपन्या अशा होत्या, ज्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले होते. निवडणूक रोख्यांमध्ये फक्त ३७ टक्के पैसे हे भाजपला मिळाले आहेत. उरलेले ६३ टक्के पैसे विरोधी पक्षाला मिळाले आहेत. निवडणूक रोखे होते म्हणून आपल्याला पैशांचा माग काढता आला. निवडणूक रोखे रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रामाणिकपणे कधी विचार केला तर सगळ्यांना पश्चाताप होईल.’

राम मंदिराबाबत…

‘राम मंदिराच्या घटनेचे आम्ही राजकारण करत नाहीत. आमचा जन्मही जेव्हा झाला नव्हता, आमचा पक्षही जेव्हा स्थापन झाला नव्हता, तेव्हाच हा विषय न्यायलयात निकाली काढला जाऊ शकत होता. तेव्हाच समस्या सुटली असती. मतपेटीच्या राजकारणासाठी या विषयाचा शस्त्राप्रमाणे वापर केला गेला. यासाठी हा विषय मार्गी न लावता त्याला नव्याने धार दिली गेली. एवढेच नाही, तर न्यायालयात यावर निर्णय होऊ नये, म्हणून अडचणी निर्माण केल्या गेल्या,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘राम मंदिर उभारण्यासाठी देशातील गोरगरिबांनी पै-पै जमा केले. लोकसहभागातून मंदिर उभे राहिले,’ असेही ते म्हणाले. राम मंदिरानंतर कोठेही आग लागली नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

विरोधक लक्ष्य

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘सोमनाथ मंदिरापासूनच्या पुढील सर्व घटना पाहा. भारताच्या परंपरेला, संस्कृतीला विरोधक विरोध करीत आले आहेत. सोमनाथ मंदिराच्या वेळीही तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना जाऊ देण्यात आले नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण आम्ही पाठवले होते. मात्र, ते धुडकावून तुम्हाला काय मिळाले? तुमच्या सर्व जुन्या चुका बाजूला ठेवून घरी येऊन तुम्हाला निमंत्रण दिले, तरी तुम्ही त्याला फेटाळून लावले. यापेक्षा मोठी चूक काय असू शकते,’ असा सवालही त्यांनी केला.

रोजगाराच्या मुद्द्यावर…

केंद्र सरकारच्या काही अटी आणि शर्तींमुळे ‘टेस्ला’ची इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात आतापर्यंत उतरू शकली नव्हती. मात्र, व्यापारवाढीसाठी ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी लवकरच भारतात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या मुद्द्यावर पंतप्रधान म्हणाले, ‘एलॉन मस्क भारताचेच समर्थक आहेत. मला भारतात गुंतवणूक पाहिजे आहे. पैसा कोणाचाही लागला तरी घाम म्हणजेच मेहनत माझ्या देशाची असली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. माझ्या देशातील तरुणांना रोजगार मिळेल हे माझे उद्दिष्ट आहे.’

सुनेत्रा पवारांबाबतचा प्रश्न, पवारांनी राजकीय कारकीर्दीत महिला हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचला

‘ईडी’, सीबीआय कारवाईबाबत…

विरोधी पक्षांविरोधात ईडी, सीबीआयचा वापर केल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले ,‘तपास यंत्रणांनी सर्वाधिक गुन्हे अशा व्यक्ती आणि संस्थांविरोधात दाखल केले आहेत, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही. ज्या व्यक्तीने काही केले आहे त्याला भीती वाटते. प्रामाणिक माणसाला काय भीती वाटते? मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या गृहमंत्र्यांना तुरुंगात डांबले होते. ‘ईडी’च्या केवळ तीन टक्के प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग असतो आणि ९७ टक्के खटले राजकारणाशी संबंधित नसलेल्यांविरुद्ध दाखल होतात, हे देशाने समजून घेतले पाहिजे.’ गेल्या वर्षी भारतात झालेल्या जी-२० परिषदेत भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी करार झाला होता, तो मोठा गेम चेंजर ठरेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

मला एक मिनिटही गमावायचा नाही. सन २०१९ च्या निवडणुकीला मी पुढील १०० दिवसांचे काम देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलो. पुन्हा सत्तेत आल्यावर ‘कलम ३७०’ रद्द केले. तिहेरी तलाक रद्द करून माझ्या मुस्लिम भगिनींना मुक्त केले. पहिल्या १०० दिवसांत ही कामे केली. आताही तसेच नियोजन केले आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Source link

modi ki guaranteeNarendra ModiPM Modi On Guaranteepm modi speechprime minister narendra modiram templeSomnath Templeईडीसीबीआय३७० अधिनियम
Comments (0)
Add Comment