हायलाइट्स:
- आरोपी बाळ ज. बोठे याचं वर्तन संशयास्पद
- जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला
- बोठे याला १३ मार्च २०२१ रोजी झाली होती अटक
अहमदनगर :रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. समोर आलेल्या पुराव्यांवरून आरोपीचं वर्तन संशयास्पद असल्याने त्याचा गुन्ह्यातील सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
आरोपी बाळ बोठे याने १४ जुलै रोजी जामीन अर्ज केला होता. त्यावर जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीतर्फे अॅड. महेश तवले तर सरकारतर्फे अॅड. उमेशचंद्र यादव यांनी बाजू मांडली. बुधवारी न्यायालयाने यावर निर्णय देत अर्ज फेटाळून लावला. ३० नोव्हेंबर २०२० रोजी हा गुन्हा घडला होता. यामध्ये बोठे याला १३ मार्च २०२१ रोजी अटक झाली. तेव्हापासून तो तुरूंगात आहे.
२४ नोव्हेंबर व ३० नोव्हेंबर २०२० या दोन्ही दिवशी रेखा जरे यांचे लोकेशन घेण्याचा आरोपी बोठेचा सतत सुरू असलेला प्रयत्न संशयास्पद असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. या दोन्ही दिवशी बोठेकडून जरेंचे सतत घेतले जात असलेले लोकेशन काही तरी उद्देश ठेवून म्हणजेच हेतुपुरस्सर व संशयास्पद आहे. तसंच २४ नोव्हेंबरला जरेंच्या गाडीला अपघात करण्यासाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोचा विमा उतरवल्याची कागदपत्रे बोठेशी संबंधित असल्याचं दिसून येत असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.
सरकारतर्फे युक्तिवाद करताना अॅड. यादव यांनी म्हटलं की, जरे आणि बोठे यांचे नाजुक मैत्रीपूर्ण संबंध होते. याच संबंधात विसंवाद झाल्याने बोठे याने जरे यांचा छळ सुरू केला होता. जरे यांचे सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या शहरातील इतर जणांशी असणाऱ्या सलगीचा संशय घेऊन बोठे याने रेखा जरे यांचा अतोनात छळ केला होता. यातूनच बोठे याने सुपारी देऊन जरे यांची हत्या घडवून आणली. त्यानंतर बोठे जवळपास तीन महिने पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याला अखेर तेलंगाणा येथे शिताफीने अटक करून येथे आणण्यात आले. नगर ग्रामीण पोलिसांनी मेहनतीने बोठे याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद अॅड. यादव यांनी केला. त्यांना अॅड. सचिन पटेकर यांनी सहाय्य केलं.
आरोपीतर्फे अॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सांगितलं की, बोठे याने हनी ट्रॅप संबंधी वृत्तमालिका छापल्याने सागर भिंगारदिवेने गुन्ह्यात बोठेचं नाव घेतलं आहे. आरोपीचे रेखा जरे यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. रुणाल जरे यांच्याशी सतत संपर्कात होता. बोठे याचा रेखा जरे यांना मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता. पोलिसांनी घाईघाईत कोणताही सबळ पुरावा नसताना बोठेला आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
दरम्यान, दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यावर जिल्हा न्यायालयाने आरोपी बोठेचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळला आहे. याच गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फिरोज शेख यानेही जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, त्याच्या सुनावणीला त्याच्यावतीने काम पाहणारे त्याचे वकील सतत गैरहजर राहात असल्याने जिल्हा न्यायालयाने शेखचा जामिनासाठीचा अर्ज निकाली काढला आहे.