‘सात दशकांनंतर जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचे, तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्याचे, महिलांना लोकसभा, विधानसभेत आरक्षण देण्याचे आणि ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना लागू करण्याचे धाडस भाजपच्या मजबूत सरकारने केले. याआधीचे ‘कमकुवत’ काँग्रेस सरकार सीमेवरील पायाभूत सुविधाही मजबूत करू शकले नाही. मात्र आता सीमेवर रस्ते आणि बोगदे बांधले जात आहेत,’ अशी तुलना मोदी यांनी केली.
आपण भ्रष्टाचाऱ्यांना देशाची लूट करण्यापासून रोखले. त्यामुळे त्यांचा आपल्याविरोधातील राग पराकोटीला पोहोचला असल्याचे सांगतानाच, मां धरीदेवी आणि ज्वालपादेवी यांचे प्रतीक असलेल्या ‘शक्ती’ नष्ट करण्याचे भाष्य करणाऱ्या काँग्रेसला उत्तराखंडच्या जनतेने चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले. उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या पाच जागा असून, १९ एप्रिलला एकाच टप्प्यात इथे मतदान होणार आहे.
‘भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगवास ही मोदीहमी’
‘भ्रष्टाचाराविरोधीतील धडक कारवाईमुळेच विरोधकांनी ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. परंतु, भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात जावेच लागेल, ही मोदींची ‘गॅरंटी’ आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील करौली येथील सभेत म्हणाले. भ्रष्टाचाराबाबत आपण कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना भीक घालणार नाही. केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे’, असे मोदी यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा
‘पाकिस्तानने दहशतवाद संपवायला हवा. तसे स्पष्ट उद्दिष्ट समोर ठेवून पाकिस्तानने प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. पाकिस्तान स्वत:च्या भूमीवरील दहशतवाद संपविण्यास सक्षम नसेल तर त्यासाठी भारत सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, पाकिस्तानने दहशतवादाचा भारताविरोधात वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.