म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार आता तपास संस्थांच्या कारवाईच्या फेऱ्यात अडकण्याचे संकेत आहेत. त्यांना गुरुवारी सरकारी सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. दिल्लीतील ‘आप’ सरकारच्या कामांची गुप्त माहिती असलेले कुमार यांच्यावरील या कारवाईमुळे केजरीवाल यांच्यासह ‘आप’ची डोकेदुखी वाढली आहे.दक्षता संचालनालयाने कुमार यांच्याविरुद्धच्या २००८मधील एका जुन्या खटल्याचा आधार घेताना, सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून त्यांना सेवेतून बडतर्फ केले. विभवकुमार हे केजरीवाल यांचे विश्वासू मानले जातात. दक्षता विभागाच्या म्हणण्यानुसार, कुमार यांच्या नियुक्तीवेळी योग्य प्रक्रियेचे पालन न करता नियमांचे उल्लंघन केल्याबाबत सविस्तर चौकशी केल्यानंतरच त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तपास यंत्रणेने विभवकुमार यांच्यावर कारवाई करण्याआधी त्यांची चार तास चौकशी केली. विभवकुमार हे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे राजकीय सल्लागार आहेत. ‘आप’ पक्षसंघटना आणि दिल्ली सरकारमध्ये पडद्याआडून कामे करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे मानले जाते.
‘विभवकुमार यांची नियुक्तीच बेकायदा होती. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरू होती. तुरुंगात असलेले केजरीवाल यांच्या सांगण्यावरून विभवकुमार या घोटाळ्यातील पुरावे आणि साक्षीदार नष्ट करीत होते. त्यांना सेवेतून काढून टाकल्याने निष्पक्ष तपास करणे शक्य होईल,’ असे दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा म्हणाले.

दिल्लीतून सत्ताधारी ‘आप’ला नष्ट करणे हा भाजपचा एकमात्र अजेंडा आहे. दिल्लीतील कथित मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी आधी मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. आता नायब राज्यपालांनी वैयक्तिक सचिवांसह त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची सूडाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
– जस्मीन शहा, ‘आप’ नेत्या