हायलाइट्स:
- दूध उत्पादकांना मोठा दिलासा
- जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने केली मोठी घोषणा
- बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ७१ लाख रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. उपाध्यक्ष नंदलाल काळे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, संघाचे संचालक राजेंद्र पाथ्रीकर, हिराबाई सोटम, सविता अधाने, के.एम. डिके पाटील, गोकुळसिंग राजपूत, पुंडलिक काजे, राजेंद्र जैस्वाल, कुशिवर्ता बडक, प्रभाकर सुरडकर, शिलाबाई कोळगे, दिलीप निरपळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार बागडे म्हणाले की, करोनाच्या या संकटकाळात दूध संकलन व वितरणावर गंभीर परिणाम झाला. संकलन व वितरण कमी झाले होते. त्यामुळे संघाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊन निव्वळ नफा कमी झाल्याचं यावेळी अध्यक्ष बागडे यांनी सांगत दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता नुकतीच खरेदी दरात प्रती लिटर एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता खरेदी दर हा २७ रुपये प्रती लिटर झाला आहे. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीलिटर २५ पैसे प्रमाणे ७१ लाख २५ हजार रुपयांचा भावफरक वाटप करण्यात येईल, असंही बागडे यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान, डॉ. काळे यांनी दूध संकलन कमी असताना दूध भुकटी प्रकल्प उभारणीचा घाट का? पूर्वी ५ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या आता कर्ज झाले, असा आरोप केला. त्यावर सिल्लोड येथे प्रकल्प, गांधेली येथे विस्तारीकरण असे सुमारे २० कोटींची कामे झाली आहेत, संघाला अधिक बळकट करण्यासाठी संघाने कसोशीने प्रयत्न केल्याचं सांगत आमदार बागडे यांनी हे आरोप राजकीय स्वरुपाचे असल्याचं सांगितलं आहे.