काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून, ‘मोदींच्या भाषणांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) आंतर्भाव आहे,’ अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत १८० जागांचा आकडा पार करण्यासाठीही संघर्ष करावा लागेल अशी भीती भाजपला वाटत असल्याने पंतप्रधान ‘हिंदू-मुस्लिम’ या वादाचा वापर करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जनसंघाचे संस्थापक, तत्कालीन हिंदू महासभेचे अध्यक्ष श्यामा प्रसाद मुखर्जी १९४०च्या सुरुवातीला मुस्लिम लीगसोबत बंगालमधील युती सरकारचा भाग होते, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले.
‘स्वत:ची इच्छा लादण्याचा प्रयत्न’
‘भाजप सातत्याने स्वत:ची इच्छा तमिळनाडूतील नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे; तसेच ‘नीट’ परीक्षा आणि केंद्र सरकारकडून निधीतील घट यामुळे होणारे विध्वंसक परिणाम झाकण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून, पंतप्रधान मोदी यांना तमिळनाडूबाबत काही प्रश्न विचारले. ‘पंतप्रधान मोदी यांना लोकांचे प्रतिनिधित्व करायचे आहे, की त्यांच्यावर सत्ता गाजवायची आहे? नीट परीक्षा २०१७मध्ये भाजप सरकारने आणली. त्यामुळे गरीब आणि वंचित समुदायातील मुलांना तोटा होईल, या भीतीने लोकांनी या परीक्षेला मोठा विरोध केला. लवकरच ही भीती खरी ठरली. सन २०१९मधील डेटानुसार केवळ दोन टक्के मुले खासगी कोचिंग क्लास लावल्याशिवाय या परीक्षेत पास झाली आहेत. कोचिंग सेंटर अडीच लाख ते पाच लाखांदरम्यान पैसे घेत असल्याने, वंचित मुले परीक्षेत पास होणे जवळपास अशक्य आहे,’ असे रमेश यांनी म्हटले आहे.
‘‘भारत छोडो’ आंदोलनात इंग्रजांच्या पाठीशी कोण उभे होते, भारतातील सर्व तुरुंगांत काँग्रेसचे नेते होते; त्या वेळी देशाचे विभाजन करणाऱ्या शक्तींसोबत राज्यांमध्ये सरकार कोण चालवत होते?
राहुल गांधी, काँग्रेस नेते