हायलाइट्स:
- कोल्हापूर-मुंबई विमानसेवा गेल्या तीन आठवड्यांपासून बंदच
- सेवेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्चचिन्ह
- कोल्हापूर विमानसेवेला भविष्यकाळात मोठा फटका बसण्याची शक्यता
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचा मुंबईबरोबरचा कनेक्ट अधिक वेगवान व्हावा म्हणून मुंबई कोल्हापूर विमानसेवा सुरू झाली. १५ वर्षात अनेकदा बंद होत होत पुन्हा नव्याने सुरू होणारी ही सेवा आता तर बेभरवशाची झाली आहे. मुळात आठवड्यातून तीन वेळा असणारी ही सेवा गेल्या तीन आठवड्यांपासून बंदच आहे. यामुळे विमान नक्की उडणार की नाही, याची खात्रीच मिळत नसल्याने या सेवेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहेत.
कोल्हापूर मुंबई विमानसेवेला अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर चार वर्षांपूर्वी मुहूर्त मिळाला. एअर डेक्कन कंपनीची विमानसेवा सुरू झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. पण कंपनीने अचानक ही सेवा बंद केली. कोल्हापूरकरांनी पुन्हा पाठपुरावा केल्याने दोन वर्षापासून ट्रुजेट कंपनीने ही सेवा पुन्हा सुरू केली. ही सेवा रोज असावी अशी आग्रही मागणी असतानाही केवळ तीन दिवसच विमानाचे उड्डाण होते. मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी मिळणाऱ्या या सेवेतही सातत्य नाही. करोना संसर्गाच्या काळात अनेकदा ती खंडित झाली. आता संसर्ग कमी झाल्याने नियमित सेवा मिळावी अशी अपेक्षा असताना ती सतत खंडित होत आहे. या विमानावर भरवसा ठेवून मुंबईला तातडीच्या कामासाठी जाण्याचे ठरवल्यास अचानक विमानउड्डाण रद्द केल्याचा मेसेज येतो. यामुळे या सेवेवरचा विश्वासच कमी होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून रोज मुंबईला जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे ७२ सीटच्या या विमानाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. सरासरी ६० पेक्षा अधिक प्रवासी असतात. तरीही किरकोळ कारणे सांगून सेवा रद्द करण्याचा प्रकार वाढला आहे. यामुळे कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेऐवजी अनेकजण बेळगावमधून मुंबईला जाण्याचा मार्ग निवडत आहेत. ते सोयीचे नसले तरी त्याची खात्री असल्यानेच कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवासी बेळगावमार्गे मुंबई व इतर शहराकडे जात आहेत. याचा मोठा फटका भविष्यकाळात कोल्हापूर विमानसेवेला बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोल्हापूर विमानतळाला उत्कृष्ठ सेवेबाबत देशपातळीवरचा पुरस्कार नुकताच मिळाला. करोना संसर्गाच्या काळातही चांगल्या सेवा सुविधा दिल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला. पण मुंबई कोल्हापूर विमानसेवा सतत खंडित होत असल्याने प्रवाशांमधील नाराजी वाढत आहे. गेल्या तीन आठवड्यात विमानचे उड्डाणच झाले नाही. ते नेमके कधी पुन्हा सुरू होणार याची खात्री नाही. लवकरात लवकर ही सेवा सुरळीत होईल, असा विश्वास व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
‘कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला पश्चिम महाराष्ट्रातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ही सेवा रोज सुरू व्हावी अशी आग्रही मागणी होत असताना आहे ती सेवा सतत खंडित होत असल्याने प्रवाशांचा विश्वास उडण्याची शक्यता आहे. यामुळे नियोजित वेळेप्रमाणे ही सेवा देण्याचा आटोकाट प्रयत्न होण्याची गरज आहे,’ असं सल्लागार समितीचे माजी सदस्य समीर शेट यांनी म्हटलं आहे.
अशी आहे सेवा :
उड्डाण – मंगळवार, बुधवार गुरूवार
मुंबईहून उड्डाण – दुपारी १२.५५
कोल्हापूरतून उड्डाण – दुपारी २.३०
तिकी – २६०० रूपये
सध्याच्या सेवा – तिरूपती, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद