केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड इच्छुक असलेले छत्रपती संभाजीनगर, शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार असलेले नाशिक, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दावा केलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील चढाओढ संपत नसलेले दक्षिण मुंबई, ठाणे, पालघर यासारखे मतदारसंघ; तसेच उत्तर पश्चिम मुंबई ,उत्तर-मध्य मुंबई या साऱ्या जागांवर महाआघाडीच्या प्रचाराने वेग घेतला तरी महायुतीच्या उमेदवारांबाबत भिजत घोंगडे कायम आहे.
उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी देण्याबाबत राज्यातील भाजप नेतृत्व उत्सुक नसल्याचे समजते; पण येथून दोनदा जिंकलेल्या महाजन यांना पर्यायही सापडत नाही, अशी भाजपची अवस्था आहे. येथून उमेदवारीसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अद्याप होकार दिलेला नाही.
भाजपने उत्तर प्रदेशात बहुतांश जागांवरील उमेदवार जाहीर केले असले, तरी सहा वेळचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (कैसरगंज) तसेच पूनम महाजन (उत्तर-मध्य मुंबई) यांच्यासारख्या विद्यमान खासदारांबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा जाहीर केलेला नाही. दुसरीकडे, अवध पट्ट्यातील अनेक मतदारसंघात ब्रिजभूषण यांचा ‘प्रभाव’ असल्याने त्यांच्याबाबतचा निर्णय घेणे भाजप नेतृत्वाला अजूनही शक्य होत नाही.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
ब्रिजभूषण यांच्याबाबत धोक्याचे संदेश
कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर उमेदवारी देऊ नये, असे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातील मत आहे. ब्रिजभूषण यांच्या पत्नी किंवा मुलाला तिकीट देण्याची भाजप नेतृत्वाची तयारी असली, तरी ते यासाठी तयार नाहीत. वादग्रस्त केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा-टेनी यांना भाजपने उमेदवारी दिली तरी ब्रिजभूषणसिंह यांच्या उमेदवारीवरून पक्षनेतृत्वाला हरियाणासारख्या राज्यांतूनही धोक्याचे संदेश सातत्याने येत आहेत