इंग्लंडमधील न्यूकॅस्टल येथे २९ मे १९२९ ला हिग्स यांचा जन्म झाला. १९५४ मध्ये त्यांनी लंडनमधील किंग्स कॉलेज येथून भौतिकशास्त्रात पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. १९६० मध्ये ते एडिंबरा विद्यापीठात व्याख्याते म्हणून रुजू झाले. त्या काळात जगभरातील भौतिक शास्त्रज्ञांना मूलभूत प्रश्न भेडसावत होता, विश्वातील सर्व कण मूलतः वस्तुमानरहित असतात, तर त्यांना वस्तुमान कसे प्राप्त होते?
या प्रश्नावर प्रा. हिग्स यांनी एका क्षेत्राची (हिग्स फिल्ड) आणि कणाची (हिग्स बोसॉन) कल्पना सुचवली. त्यांच्या म्हणण्यानुसार वस्तुमानरहित मूलकण (प्रोटॉन, इलेक्ट्रॉन) हिग्स फिल्डच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची त्या फिल्डशी कशी प्रक्रिया होते, त्यानुसार त्या कणांना वस्तुमान प्राप्त होते. हिग्स बोसॉन कणांना देखील याच क्षेत्रातून वस्तुमान मिळते. हे कण इतर कणांना वस्तुमान मिळण्यासाठी कारणीभूत ठरतात.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रा. हिग्स यांनी वर्तवलेल्या हिग्स बोसॉन कणांना शोधण्याची मोहीम जगभरातील कण भौतिकशास्त्रज्ञांनी हाती घेतली त्यातूनच अब्जावधी डॉलर खर्चून लार्ज हॅड्रॉन कोलायडरची निर्मिती करण्यात आली. याच यंत्रणेमध्ये २०१२ मध्ये पदार्थाला वस्तुमान प्राप्त करून देणाऱ्या ‘हिग्स बोसॉन’ कणांचे अस्तित्व दिसून आले. प्रा. हिग्स यांना २०१३ मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. भौतिकशास्त्रातील त्यांच्या अजोड योगदानाबद्दल त्यांना या क्षेत्रातील बहुतेक सर्व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.