‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये जगभरात इस्रायलविरोधात वातावरण असताना, बायडेन यांनी इस्रायलची पाठराखण केली होती. मात्र, इस्रायलच्या कारवाईमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांसह स्वयंसेवकांचाही मृत्यू झाला. त्यावरून, कारवाई थांबवण्यासाठी बायडेन यांच्याकडून दबाव वाढत आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीच्या दक्षिणेतील राफाह शहरावर हल्ला करण्याचे नियोजन करण्यात येत असून, त्याला अमेरिकेचा विरोध आहे. ‘नेतान्याहू यांच्या भूमिकेशी मी सहमत असू शकत नाही, ते चुका करत आहेत,’ असे बायडेन यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. इस्रायलने शस्त्रसंधी मान्य करावी. तसेच, पुढील सहा ते आठ आठवड्यांसाठी गाझामध्ये जास्तीत जास्त मदत पाठवावी आणि अन्य देशांना या भागात मदतीसाठी परवानगी द्यावी, असे बायडेन यांनी म्हटले आहे.
‘इस्रायलचा बदला घेऊ’
तेहरान : इराणच्या सीरियातील लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी इस्रायलचा बदला घेण्यात येईल, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी दिला आहे. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर आयोजित सामूहिक प्रार्थनेवेळी खामेनी यांनी हा इशारा दिला आहे. इस्रायलने इराणच्या सीरियातील वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता. या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.