घातपातासाठी तरुणांची जमवाजमव; एटीएसच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

– झाकीर शेखवर होती जबाबदारी

– मलेशियातील ॲन्थोनीच्या सांगण्यानुसार काम

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या पाकिस्तानी मॉड्युलच्या संपर्कात असलेल्या झाकीर शेख याने घातपातासाठी तरुणांची जमवाजमव सुरू केली होती. मलेशियातील ॲन्थोनी नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात झाकीर होता आणि त्याच्या सांगण्यावरूनच तो काम करीत होता. आधीपासून रडारवर असलेल्या झाकीरबाबत तपासातून बरीच माहिती महाराष्ट्र एटीएसच्या हाती लागली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईसह देशभरातून सहा संशयित दहशतवाद्यांची धरपकड केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी आणि मुंब्रा येथून झाकीर शेख आणि रिझवान मोमीन या दोघांना अटक केली. झाकीर याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याने, तो अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर त्याला अटक करण्यात आली. रिझवान दोन महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे राहण्यास गेला होता. सप्टेंबरमध्ये झाकीरने मुंब्रा येथे जाऊन रिझवानची भेट घेतली आणि रिझवानच्या मोबाइलवरून त्याने मलेशियातील ॲन्थोनी नावाच्या व्यक्तीला संपर्क केला. त्यावरून एटीएसचे पथक रिझवानपर्यंत पोहोचले. रिझवानप्रमाणे झाकीर इतर तरुणांच्या शोधात होता. अनेक तरुणांना सहभागी करून त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात येणार होती.

जामिनावर बाहेर येऊन पुन्हा कारवाया

सन २०००मध्ये भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह देशांतील काही नेत्यांना टार्गेट करण्यासाठी कट रचण्यात आला होता. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या सांगण्यावरून हे कटकारस्थान रचले जात होते. मात्र, हा कट अयशस्वी ठरला आणि देशभरातून अर्धा डझनहून अधिक जणांची धरपकड करण्यात आली. यावेळी झाकीरला अटक करण्यात अली. मात्र, त्याचा भाऊ पाकिस्तानात पळून गेला. यानंतर काही वर्षे तुरुंगात काढल्यानंतर झाकीर बाहेर आला आणि पुन्हा त्याने कारवाया सुरू केल्या.

वांद्रे येथे रिझवानशी ओळख

झाकीर हा तुरुंगातून सुटल्यानंतर जोगेश्वरी येथे काही दिवस रिक्षा चालवित होता. याच दरम्यान वांद्रे येथील एका धर्मगुरूच्या दर्शनासाठी तो जाऊ लागला. याच ठिकाणी त्याची रिझवानसोबत ओळख झाली. त्यांची ही मैत्री जवळपास दहा वर्षांपासूनची असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Source link

maharashtra atsPakistan-organised terror moduleterror caseदहशतवादी हल्लामहाराष्ट्र एटीएस
Comments (0)
Add Comment