मोहम्मद अब्दुल अरफात हा ५ मार्च रोजी घराबाहेर पडल्यापासून परत आला नव्हता. क्लिव्हलँड पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्यासाठी हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी अलर्ट जारी केला होता. अरफातच्या सहनिवासी विद्यार्थ्यांनी क्लिव्हलँड पोलिसांत अरफात हरवल्याची तक्रार दाखल केल्याचे त्याच्या वडिलांना सांगितले होते. अमली पदार्थ विकणाऱ्या एका कथित गटाने अरफातचे अपहरण केल्याची माहिती देणारा दूरध्वनी एका अज्ञात व्यक्तीने १९ मार्च रोजी अरफातच्या कुटुंबीयांना केला होता. या कथित अपहरण करणाऱ्या गटाने १,२०० अमेरिकी डॉलरची मागणी केल्याचेही दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते.
एका वृत्त अहवालानुसार, क्लिव्हलँड राज्य विद्यापीठाच्या नोंदींप्रमाणे मोहम्मद अरफात जानेवारी २०२४पासून या विद्यापीठाचा विद्यार्थी नव्हता. मोहम्मद अरफातच्या मृत्यूमुळे आपण व्यथित झाल्याचे न्यूयॉर्कमधील भारतीय राजदूतांनी एक्सवरील संदेशात नमूद केले आहे.
अमेरिकेत यंदा भारतीयांचे झालेले मृत्यू
– गेल्या आठवड्यात ओहियो राज्यात उमा सत्यसाई गड्डे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
– गेल्या महिन्यात मिसुरीमधील सेंट ल्युई येथे ३४ वर्षीय भारतीय शास्त्रीय नर्तक अमरनाथ घोष यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
– बोस्टन येथील २० वर्षीय विद्यार्थी अभिजीत परुचुरू याची हत्या झाली होती.
– ५ फेब्रुवारी रोजी परड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय-अमेरिकी विद्यार्थी असलेल्या समीर कामथ हा इंडियानामध्ये निसर्ग उद्यानात मृत सापडला होता.
– वॉशिंग्टन येथील एका रेस्तराँबाहेर झालेल्या हल्ल्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ वर्षीय विवेक तनेजा हा आयटी अधिकारी गंभीररीत्या जखमी झाला होता.
– इलिनॉइस विद्यापीठाच्या आवारात जानेवारी महिन्यात अकुल धवन हा १८ वर्षीय विद्यार्थी निपचित पडलेला आढळला होता.
– जानेवारी महिन्यातच जॉर्जियामध्ये भटक्या गर्दुल्ल्याकडून २५ वर्षीय विवेक सैनी या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली होती.
भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची कॅनडात हत्या
भारतीय वंशाचे बांधकाम व्यावसायिक आणि अन्य एक व्यक्ती यांची कॅनडातील अल्बर्टा येथे गोळ्या घालून सोमवारी हत्या करण्यात आली. बुटासिंग गिल, असे त्यांचे नाव असून, त्यांची स्वतःची बांधकाम कंपनी होती.