-काय घडले ढाक्यात ?
बांगलादेशात गेले काही दिवस समाजमाध्यमांतून ‘इंडिया आऊट’ मोहीम चालविण्यात येत आहे. विरोधी पक्ष बांगला देश नॅशनलिस्ट पक्षाच्या (बीएनपी) एका नेत्याने जाहीरपणे काश्मिरी शाल जाळून भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘घरातील भारतीय साड्या जाळून टाका, स्वयंपाकघरातही भारतीय कांदा, लसूण, आले किंवा मसाले वापरू नका,’ असा टोला लगावला. भारताशी असलेला व्यापार आणि दोन्ही देशांच्या संबंधांवरून तेथे जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
-वादाची पार्श्वभूमी काय?
या वर्षाच्या प्रारंभी बांगलादेशात झालेल्या निवडणुकीमध्ये अवामी लीगने २९९ पैकी २१६ जागांचे विक्रमी बहुमत मिळविले आणि शेख हसीना पाचव्यांदा पंतप्रधान झाल्या. विरोधी ‘बीएनपी’ने या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. ‘बीएनपी’ हा पूर्वीपासून चीनधार्जिणा पक्ष असून, सत्ताधारी अवामी लीगचे भारताशी चांगले संबंध राखण्याचे धोरण आहे. त्यामुळे अंतर्गत राजकारणात भारताचा हस्तक्षेप असल्याचा आणि हसीना यांच्या विजयामागेही भारताचा हात असल्याचा ‘बीएनपी’चा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर तेथील समाजमाध्यमांत ‘इंडिया आऊट’ मोहीम सुरू झाली. माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे लंडनस्थित चिरंजीव तारिक रहमान ही मोहीम चालवित असून ‘बीएनपी’ या निमित्ताने आपला जनाधार मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीन भारतविरोधाला खतपाणी घालत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
-बांगलादेशाचे भारतावरील अवलंबित्व काय?
बांगलादेशाच्या स्वातंत्र्यापासूनच भारताने या देशाला मोठी मदत केली आहे. भारतातून येथे इंधन, वीजपुरवठ्यासह रस्ते, रेल्वे, बंदरे अशा पायाभूत सुविधा विकसित करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे; तसेच भारतामधून मसाले, कापूस, धान्ये, साखर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पोलाद, चहा आणि साड्या अशा अनेक वस्तू तेथे जातात. गेल्या नऊ-दहा वर्षांत भारत आणि बांगलादेशातील व्यापार तिपटीने वाढला असून सध्या दोन्ही देशांत सुमारे १७ अब्ज डॉलरचा व्यापार चालतो.
-चीनचा उद्देश कोणता?
गेल्या काही काळात विस्तारवादी चीन बांगलादेशातही पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’सह तेथील व्यापारात वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा व्यापार २५ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. बांगला देशात जहाज, रेल्वे अशा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चीन गुंतवणूक करीत असून, अन्य देशांप्रमाणे बांगला देशालाही कर्जाच्या सापळ्यात अडकविण्याचा चीनचा डाव असल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानमधील ग्वादार आणि श्रीलंकेतील हंबनटोटा प्रमाणे बांगला देशातही बंदरे विकसित करण्याचे प्रस्ताव आहेत. या बंदरांचा लष्करी उद्देशाने वापर होण्याची भीती असून तो भारतासाठी धोक्याचा इशारा आहे. तेथे एक गोपनीय पाणबुडी तळही विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. बंगालच्या उपसागरात आपले महत्त्व वाढवण्याचा चीनचा प्रयत्न लपून राहिलेला नाही.
-बांगलादेशमध्ये काय परिणाम होऊ शकतो?
भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भाषा तेथील नेत्यांच्या तोंडी असली, तरी असे कोणतेही पाऊल त्या देशाला अडचणींच्या खाईत लोटू शकते. विकासाच्या अनेक कामांमध्ये बांगलादेश भारतावर अवलंबून आहे. दोन्ही देशांतील नागरिकांचेही परस्परसंबंध असल्याने त्याचा मोठा दबाव तेथील सरकारवर आहे. सीमेवरून रस्तामार्गे वाहतूकही सुलभ असल्याने तेथे भारतीय माल स्वस्तात उपलब्ध होतो. हा माल बंद झाल्यास तेथील बाजारव्यवस्था विस्कळीत होण्याचा, तसेच महागाईत मोठी वाढ होण्याचा इशारा अभ्यासक देत आहेत.