राजधानी हेलसिंकीच्या सीमेवरील वंता शहरात सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व्हिएर्टोला शाळेला घेराव घातला. प्राथमिक चौकशीत त्या विद्यार्थ्याने हँडगनने गोळीबार केल्याची कबुली दिली; मात्र गोळीबारामागील हेतू स्पष्ट झालेला नाही. फिनलँडमध्ये १५ वर्षांखालील मुलास कायद्याने अटक करता येत नाही. केवळ ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलाचे म्हणणे ऐकून घेतले जाऊ शकते. प्राथमिक चौकशीनंतर त्याला बालकल्याण अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले जाते. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्याची चौकशी केली जाणार आहे.
यापूर्वी दोनदा गोळीबार
मागील काही दशकांत फिनलंडमध्ये शाळांमध्ये गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर २००७मध्ये टुसुला येथील जोकेला हायस्कूलच्या आवारात एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलाने गोळीबार केला होता. त्यानंतर गोळी झाडणारा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर वर्षभरातच सप्टेंबर २००८मध्ये दक्षिण-पश्चिम फिनलँडमधील कौहाजोकी येथील एका व्होकेशनल कॉलेजमध्ये एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने सेमी ऑटोमॅटिक पिस्तुलाने १० जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती.