गाझा पट्टीत ‘वर्ल्ड सेंट्रल किचन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मदतकार्य करणारे सहा स्वयंसेवक आणि एका पॅलिस्टिनी चालकाचा इस्रायलच्या हवाईहल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी संस्थेतर्फे देण्यात आली. परिणामी, गाझा पट्टीतील इस्रायलच्या आक्रमणामुळे उपासमार होत असलेल्या हजारो पॅलिस्टिनी नागरिकांना समुद्रामार्गे मदत पोहोचवण्याचे कार्य ठप्प पडले आहे. मृतांमध्ये तीन ब्रिटिश, एक ऑस्ट्रेलियन, एक पोलिश आणि एक अमेरिकन-कॅनडाचा नागरिक आहे.
समुद्रमार्गे देईर अल-बालाह येथील गोदामात पोहोचलेले सुमारे १०० टन अन्नधान्य पॅलिस्टिनी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांचे पथक दोन सशस्त्र वाहनांसह तीन वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करत होते. या पथकाने निघण्यापूर्वी इस्रायलच्या लष्कराशी समन्वय साधूनही हा हल्ला झाल्याचे या स्वयंसेवी संस्थेचे सीईओ एरिन गोअर यांनी सांगितले. ‘हा केवळ आमच्या संस्थेविरुद्धचा हल्ला नाही, तर हा मानवतावादी संघटनेवरचा हल्ला आहे, ज्यात अत्यंत भयावह परिस्थितीत अन्नाचा वापर युद्धाचे शस्त्र म्हणून केला जात आहे. हे अक्षम्य आहे,’ अशा शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला.
या भागातील मोहीम आम्ही तत्काळ थांबवत असल्याचे या संस्थेचे संस्थापक सेलिब्रेटी शेफ जोस अँड्रेस यांनी स्पष्ट केले. मात्र इस्रायली सैन्याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याचे औचित्य न दाखवता या मृत्यूंबाबत शोक व्यक्त केला आहे. ‘या घटनेचा उच्च स्तरावर आढावा घेतला जात आहे. अशा घटना पुन्हा होण्याचा धोका कमी व्हावा, यासाठी एक स्वतंत्र तपास सुरू केला जाईल,’ असे लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅड. डॅनियल हगारी यांनी सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या यूएनआरडब्लूए या संघटनेसाठी काम करणारे १७३ कामगार आतापर्यंत गाझा पट्टीत मारले गेल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. यात मदत पुरवणाऱ्या अन्य संघटनांचा समावेश नाही.
सीरियातील इराणी दूतावासावर इस्रायलचा हल्ला
सीरियातील इराणी दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात दोन इराणी जनरल आणि पाच अधिकारी झाले. गाझा आणि लेबनॉनच्या सीमेवर इस्रायलशी लढणाऱ्या अतिरेकी गटांना पाठिंबा देणाऱ्या इराणमधील लष्करी अधिकाऱ्यांना इस्रायलने लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.
गाझामध्ये सहा महिन्यांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायल आणि लेबनॉनस्थित इराण समर्थित हिजबुल्ला दहशतवाद्यांमध्ये संघर्ष वाढला आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासलाही इराणचा पाठिंबा आहे. इस्रायलने सीरियातील ताज्या हल्ल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इस्रायलमधील अल जजिरा बंद होणारइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संसदेत अल जजिरा वृत्तवाहिनी बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी कायदा संमत केल्यानंतर ही वाहिनी बंद करण्याचे सोमवारी जाहीर केले. ही दहशतवादी वृत्तवाहिनी असून ती चिथावणी देण्याचे काम करत असल्याचा आरोप नेतान्याहू यांनी केला. मात्र अल जझिरा वाहिनीने इस्रायलचा हा दावा ‘धोकादायक’ आणि ‘हास्यास्पद तथ्यहीन’ असल्याचा आरोप केला आहे. इस्रायल आणि अल जजिरा यांचे संबंध दीर्घकाळापासून ताणलेले आहेत. ही वृत्तवाहिनी पूर्वग्रहदूषित वृत्त देत असल्याचा आरोप इस्रायलने सातत्याने केला आहे.