मिररच्या रिपोर्टनुसार, केंटुंकीच्या विल्मोरमध्ये असबरी विश्वविद्यालयची विद्यार्थिनी इसाबेला विलिंगहम ही आपल्या खोलीत बेशुद्ध आढळून आली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा तिच्या संपूर्ण शरीरावर जखमांचा खुणा होत्या. त्यामुळे तिला क्रिटिकल केअर यूनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टर आणि विद्यार्थिनीच्या कुटुंबाला जी कहाणी कळाली त्याने सारेच हादरले.
इसाबेलाचे पिता एंडी विलिंगहम यांनी सांगितलं की, रात्री जवळपास ११ वाजता जेव्हा रुग्णालयातून आम्हाला फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की बेलाला इमरजेन्सीमध्ये भरती करण्यात आलं आहे. ती तिच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. तिच्या रुममेटनेही आम्हाला माहिती दिली. आम्ही तात्काळ रुग्णालयात पोहोचलो. डॉक्टरांनी सांगितलं की इसाबेचा श्वास २३ मिनिटं बंद होता. ती २३ मिनिटे मृतावस्थेत होती. पण, तिच्या शरीरावर या जखमा झाल्या कशा याबाबत काहीही माहिती नाही.
पोलिसांनी सांगितलं की तिच्या शरीरावर कापल्याचे आणि खरचटल्याच्या जखमा होत्या. तिचे पाय सुजलेले होते. पायावरही गंभीर जखमा होत्या. याबाबत इसाबेलाला काहीही लक्षात नव्हते. तिने सांगितले की, जेव्हा मला रुग्णालयात शुद्ध आली तेव्हा मी बघितलं की माझ्या शरीरावर जखमा दिसल्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं की कदाचित विद्यार्थिनी पलंगावरुन पडली असावी ज्यामुळे तिला जखमा झाल्या. पण, तिच्या आई-वडिलांना यावर विश्वास नाही. त्यांच्यामते बेडवरुन पडून तिला इतक्या जखमा होऊ शकत नाही. तिच्यासोबत नेमकं काहीतरी वाइट घडलं आहे.