या अभ्यासात करोनाकालखंडातील पहिल्या दोन वर्षांचे विश्लेषण करण्यात आले आहे. जगभरातील बहुसंख्य मंडळी दीर्घायुषी होत असली, तरी त्यांचे जीवनमान फारसे निरोगी नसल्याचे दिसून आल्याचेही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’मधील (आयएचएमई) हेल्थ मेट्रिक्स सायन्सेसचे सहयोगी प्राध्यापक आणि सह लेखक डेमियन सांतोमाउरो म्हणाले, ‘जगभर आरोग्य बिघडण्याचे प्रमुख कारण पाठदुखी असून, सध्या त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत.’
जागतिक स्वास्थ्य धोक्यात आणणाऱ्या या विकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपचारपद्धतीची आवश्यकता आहे, असेही सांतोमाउरो म्हणाले. ‘नैराश्य किंवा औदासिन्यग्रस्तांसाठी थेरपी, औषधोपचार यांची जोड असणे आवश्यक असते. मात्र, दुर्दैवाने जगभरातील बहुतांश लोकांना उपचार मिळत नाहीत,’ असेही वास्तव सांतोमाउरो यांनी नमूद केले.
‘करोनाकाळात वाढले नैराश्य’
‘करोनाकाळात जागतिक नैराश्य कसे वाढले, हे लक्षात घेता या विकाराने ग्रासलेल्या प्रत्येकाला योग्य वेळी योग्य उपचार मिळतील, याची खात्री करणे आवश्यक आहे. करोनावरील उपचारांना स्त्रिया किंवा पुरुष रुग्ण कशाप्रकारे प्रतिसाद देतात, याचे विश्लेषण केले असता संसर्गाचा त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक झाला. करोनामुळे महिलांना मानसिक विकारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले असले, तरी संसर्गामुळे पुरुषांचे मृत्यू अधिक झाल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे, असेही सांतोमाउरो यांनी स्पष्ट केले.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना दीर्घकाल करोनाची लागण होण्याची शक्यता दुप्पट असल्याचे आढळले. त्यामुळे या काळात त्या नैराश्याने सर्वाधिक प्रभावित होत्या.- डेमियन सांतोमाउरो