हायलाइट्स:
- एसटी बस पुराच्या पाण्यात कलंडली
- गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली दुर्घटना
- गावकऱ्यांनी सर्व २३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं
जालना : कसुरा नदीवरील पुलावर एसटी बस पुराच्या पाण्यात कलंडली. परतूर तालुक्यातील श्रीष्ठी गावाजवळ गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात (Jalna Bus Accident) झाला. गावकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन बसमधील सर्व २३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
शेगाव-पंढरपूर या दिंडी महामार्गावरील परतूर आष्टी धोतरजोडा या दरम्यान कसुरा नदीवरील पुलावरून गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पुराचे पाणी वाहत आहे. या परिस्थितीतही पुलावरून वाहतूक सुरू आहे. परतूर आगाराची बस क्रमांक एमएच २० बीएल २२८० ही बस या पुलावरून श्रीष्ठी गावाच्या दिशेने जात असताना पुलावरील एका खड्ड्यात बसचे पुढचे चाक अडकले आणि त्यानंतर बस एका बाजूला कलंडली.
या वेळी पुलावरून साधारणपणे दोन ते तीन फूट पाण्याचा प्रवाह वाहत होता. रात्रीच्या अंधारात बस कलंडताच एकच हल्लकोळ उडाला. पुलाच्या दोन्ही काठावर काही गावकरी उभे होते. त्यांनी मदतीसाठी क्षणार्धात धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना ओढून त्यांनी बाहेर काढले. तीन प्रवासी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. मात्र गावकऱ्यांनी लगेच त्यांना पकडून पाण्याच्या बाहेर काढण्यात आलं.
दरम्यान, घटनास्थळी एसटी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद मेहूल, उपविभागीय महसूल अधिकारी जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे, सरपंच प्रदीप अंभोरे यांनी तातडीने जाऊन मदत कार्य केले. रात्री साडेनऊ वाजता बस पाण्यातून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे.