हायलाइट्स:
- गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा ठरणार वादळी.
- संचालिका शौमिका महाडिक यांनी केला गंभीर आरोप.
- पाच महिन्यांत दूध संघाला ५५ कोटींचा फटका बसला!
कोल्हापूर:गोकुळ दूध संघाने नवीन प्रकल्पासाठी नवी मुंबईत वाशी येथे १९ कोटीची जमीन खरेदी केली असतानाही पुन्हा भोकरपाडा येथे ३०० कोटी रुपयांचा खर्च कशासाठी केला जात आहे, असा सवाल गोकुळच्या संचालिका आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला. गेल्या पाच महिन्यात सत्ताधारी आघाडीच्या मनमानी आणि चुकीच्या कारभारामुळे गोकुळ दूध संघाला ५५ कोटी रुपयांचा फटका बसल्याचा आरोपही त्यांनी केला. ( Gokul Dudh Sangh Latest News )
वाचा: कोल्हापुरात फड गाजविलेल्या किरीट सोमय्यांवर पारनेमध्ये नामुष्की
गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाइन होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सत्ताधारी आघाडीवर अनेक आरोप केले. महाडिक म्हणाल्या, ‘ऑनलाइन सभेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेण्यापेक्षा जेव्हा सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सभा होईल, तेव्हा गोकुळच्या विविध प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात यावे.’
वाचा: रजनी पाटलांच्या बिनविरोध निवडीसाठी फडणवीसांची अट?; थोरात म्हणाले…
गोकुळच्या विस्तारासाठी नवी मुंबईत वाशी येथे १९ कोटींची जमीन घेण्यात आली आहे. दुसरीकडे भोकरपाडा येथे जमीन आणि नवीन प्रकल्प उभारणीसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या जमिनीची गरज आहे का, असा सवाल करून महाडिक म्हणाल्या, हा अवाढव्य खर्च करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी विनाकारण घातला आहे. दूध उत्पादकांना दरवाढ दिल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण, ठराविक कालावधीनंतर संघामार्फत दूध दरवाढ दिली जाते. त्याच पद्धतीची ही दरवाढ आहे. यामुळे याला वचनपूर्ती म्हणता येणार नाही. दरम्यान, व्यंकटेश्वरा गुड्सच्या टँकरच्या व्यवहारात आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही असे पत्र सत्ताधारी आघाडीने दिले आहे. यावरून निवडणुकीत केलेले आरोप चुकीचे होते हे स्पष्ट होते.
पाच महिन्यात संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे संघाला ५५ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा आरोपही महाडिक यांनी केला. यावेळी माजी संचालक धैर्यशील देसाई, दीपक पाटील, प्रताप पाटील, रणजीतसिंह पाटील उपस्थित होते.
वाचा: मुंबई: खार येथे आठ मजली इमारतीत आग; धुरात गुदमरून महिलेचा मृत्यू