केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘सार्वत्रिक निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तिसऱ्यांदा सत्तेची सूत्रे सोपवणे जेणेकरून ते २०४७पर्यंत भारताला विकसित देश बनवू शकतील,’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
शहा हे गांधीनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी गांधीनगर जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही त्यांच्यासोबत होते. दुपारी १२.३९ वाजता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा काळ ‘विजय मुहूर्त’ मानला जातो.
त्यांनी पत्रकारांना सांगितले की, या सार्वत्रिक निवडणुकीचा अर्थ पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा सत्तेवर आणणे आहे, जेणेकरून ते २०४७पर्यंत भारताला विकसित देश बनवू शकतील. मोदींचा तिसरा कार्यकाळ महत्त्वाचा असेल, कारण त्यांच्या पहिल्या दोन कार्यकाळापैकी बहुतेक वेळ हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारने केलेल्या चुका सुधारण्यात गेला.
शहा म्हणाले, ‘या निवडणुका नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार आहेत. मोदींनी २०४७पर्यंत भारताला सर्व क्षेत्रांत विकसित आणि अव्वल देश बनवण्याचे आश्वासन दिले आहे. आपल्याला हे साध्य करायचे असेल, तर पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत. कारण मागील १० वर्षे आधीच्या ‘संपुआ’ सरकारने केलेले खड्डे भरून काढण्यात गेले.’ पुढील पाच वर्षांचा उपयोग ‘विकसित भारता’चा मजबूत पाया तयार करण्यासाठी केला जाईल, असेही ते म्हणाले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या जागेवरून पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी भाजपचे आभार मानले. तसेच ही जागा महत्त्वाची आहे, कारण पंतप्रधान मोदी येथे मतदार आहेत, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्ष काँग्रेसने गांधीनगरमधून पक्ष सचिव सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.