महाविकास आघाडीला हादरे; छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचा आमदार थेट हायकोर्टात

हायलाइट्स:

  • रायगडनंतर आता शिवसेना-राष्ट्रवादीची नाशिकमध्ये जुगलबंदी
  • शिवसेनेच्या आमदाराचे छगन भुजबळ यांच्यावर आरोप
  • आमदार सुहास कांदे यांची थेट उच्च न्यायालयात धाव

नाशिक: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उलटसुलट वक्तव्यामुळं आधीच राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण रंगलेलं असताना नाशिकमध्ये नवंच संकट उभं राहिलं आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन विकास निधी वकल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. (Chhagan Bhujbal Vs Suhas Kande)

सुहास कांदे यांच्या मतदारसंघात पूर आल्याने त्यांनी पालकमंत्र्यांकडे आपत्ती व्यवस्थापन निधीतून नांदगावला मदत करण्याची मागणी केली होती. ११ सप्टेंबर रोजी भुजबळ यांनी पालकमंत्री या नात्याने नांदगावचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी कांदे यांनी तातडीने मदतीची मागणी केली होती. परंतु भुजबळ यांनी नकार दिल्याने कांदे व भुजबळ यांच्यात व्यासपीठावर संघर्ष झाला होता. त्या दिवसापासून कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष सुरू झाला आहे. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्या. नंतर शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या विरोधात थेट घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी सुहास कांदे यांनी केली होती. परंतु अद्यापही हा निधी मिळाला नसल्याने कांदे आक्रमक झाले असून त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

वाचा: तसं असेल तर लोकांनी कुठल्या नगरसेवकाला भेटायचं?; राज ठाकरेंचा सवाल

आमदार कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतल्याने दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष अधिकच वाढला आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यामुळे आता हा वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

संघर्ष जुनाच

विधानसभा निवडणूकीत आमदार कांदे यांनी नांदगाव मतदारसंघात पालकमंत्री भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव केला आहे.त्यामुळे भुजबळ विरुद्ध कांदे यांच्यात नेहमी संघर्ष सुरू असतो. पंकज भुजबळ या मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्याने वादाला अधिक फोडणी मिळाली आहे.

वाचा: ‘नाहीतर किरीट सोमय्यांच्या मुंबईतील घरावर मोर्चा काढू’

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्यानंतर छगन भुजबळ यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. या प्रकरणातून न्यायालयानं नुकतीच त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता भुजबळ यांना नव्या न्यायालयीन लढाईला सामोरं जावं लागणार आहे.

Source link

chhagan bhujbalChhagan Bhujbal Vs Suhas KandeDistrict Development FundnashikShiv Sena Vs NCP in NashikSuhas Kandeजिल्हा नियोजन विकास निधी
Comments (0)
Add Comment