मटा ग्राऊण्ड रिपोर्ट : सट्टेबाजांच्या गावात लोकसभेची ‘हवा’, यंदा देशात कुणाची सत्ता? निकालाचा अंदाज

फलोदी (राजस्थान) : हवेत बूट भिरकावला तर तो सरळ पडणार की पालथा…? रस्त्यावर बैलांची झुंज लागली तर कोणता बैल कोणाला ढुशी मारणार…? अमेरिकेत ट्रम्प जिंकणार की बायडेन..? वर्ल्डकप भारत जिंकणार की ऑस्ट्रेलिया….? यांसारख्या अगदी कोणत्याही विषयावर सट्टा लावणारं सट्टेबाजांचं गाव जोधपूरपासून १४४ किलोमीटर अंतरावर आहे. फलोदी त्याचं नाव. देशातली सट्टा लावण्यासाठीची सर्वांत जुनी म्हणजे अंदाजे ४०० वर्षांपासूनची ही प्रसिद्ध अशी भूमी. फलोदीची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचं सांगितलं जातं. बरं इथं अगदी हातावर पोट असलेला मजूर…मध्यमवर्गीय ते… गर्भश्रीमंत असणारे अशा सर्व आर्थिक स्तरातील लोक सट्टा लावतात. जिंकतात, हरतात…पुन्हा जिंकतात..अशी इथली खासियत. इथल्या ‘सटोरियां’नी महाराष्ट्र, राजस्थानसह, देशाचे लोकसभेच्या निकालाचे अंदाज वर्तवले आहेत.

गांधी चौकातील वेगळं विश्व

राजस्थानातील इतर गावांप्रमाणं हे गाव तसं साधंच. मात्र, त्याची चर्चा अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात. सकाळी अकरापासून ते रात्री उशिरापर्यंत इथं सट्टे लावले जातात. शहराच्या गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा एक पुतळा आहे आणि त्याच्या आसपासच छोट्या छोट्या खोपट्यांमध्ये, पुरातन हवेल्यांमधील खोल्यांमध्ये, या हवेल्यांच्या बाहेर असलेल्या पडव्यांमध्ये सट्ट्याचे डाव रंगतात. अरुंद गल्लीबोळातून आपण इथपर्यंत पोहोचतो. तेव्हा प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न असतो. इथे अंदाजे २० ते २२ मुख्य ‘सटोरिये’ आहेत, असं सांगितलं जातं. उघडउघड चर्चा होते. या भागातील सटोरियांवर कोणतीही कारवाई होत नाही; पण शहराच्या अन्य भागातील सट्ट्यासाठीच्या अड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो.

तीन-चार दिवसांनी बदल

इथं आल्यावर इथले प्रमुख आणि अनुभवी सटोरिये विकास चांडा आणि त्यांचे काका अंतुभाई चांडा यंदाच्या लोकसभेबाबत विविध अंदाज वर्तवतात. अर्थात इथले अंदाजही तीन-चार दिवसांनी बदलत राहतात. मात्र, या साऱ्या सट्टेबाजाराच्या विश्वामागे एक ‘व्यवस्था’ कार्यरत असल्याचे अंतुभाई म्हणतात. ‘इथे येऊन, ऑनलाइनच्या माध्यमातून कोण किती पैसे लावतो. कोणाचा भाव वधारतो, कोणाचा पडतो. या साऱ्याचे एकत्रित विश्लेषण करूनच आम्ही अंदाज बांधतो. आतापर्यंत काही अपवाद वगळता आम्ही मांडलेले बहुतांश अंदाज खरे ठरले आहेत,’ असा दावा अंतुभाई करतात.

महायुतीत रत्नागिरी – सिंधुदुर्गची जागा शिंदेंनी गमावली, आदित्य ठाकरेंनी डिवचलं

महाराष्ट्रात काय होणार?

सट्टाबाजाराचं हे विश्व अगदी जवळून पाहिल्यावर, तिथल्या कोणत्याशा माडीवर होणारी ‘चिठ्ठ्यां’वरील नोंद पाहिल्यावर उत्सुकतेपोटी महाराष्ट्रात काय होणार, असा प्रश्न अंतुभाईंना केला. त्यावर त्यांनी महाराष्ट्रातील, राजस्थानातील आणि देशातील आकडेवारीच पुढे ठेवली. महाराष्ट्रात महायुतीला ३८ ते ४० जागा, राजस्थानात भाजपला २१ ते २२ जागा मिळतील. देशात एकट्या भाजपला ३२० ते ३२२ जागा, तर ‘एनडीए’ला ३५० च्या आसपास जागा मिळतील. सुरुवातीच्या अंदाजानुसार मी हे सांगत आहे. त्यात पुढे कमी-जास्त होऊ शकते,’ असे अंतुभाई म्हणाले. ‘एनडीए ४०० पार काही जात नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘चाचण्यांसाठी अंतुभाईंची मदत’

अंतुभाई नावाच्या अजब व्यक्तिचा या क्षेत्रातला अनुभव दांडगा असल्यामुळे विविध चॅनेलचे प्रतिनिधी, एक्झिट आणि ओपिनियन पोलवाले कायम त्यांना फोन करून सट्टेबाजाराचा अंदाज घेतात. हा अंदाज घेतल्यावरच विविध मतदानपूर्व किंवा मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे फुटतात, असा दावा विकास चांडा करतात. फलोदी सट्टाबाजाराने सांगितलेले बहुतांश अंदाज तीन ते पाच जागांच्या फरकाने तंतोतंत खरे ठरल्याचे इथल्या कट्ट्यांवरचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. गेल्या वर्षी राजस्थानात भाजपची सत्ता येण्याचा अंदाज या सट्टेबाजाराने वर्तवला होता.

Source link

bjplok sabha elections 2024NDAPhalodi Satta Bazarrajasthan newssatte bazarup govt
Comments (0)
Add Comment