Thane Crime Update: ठाणे: चोरट्यांनी मोबाइल खेचल्यानंतर धावत्या रिक्षातून पडून महिलेचा मृत्यू

हायलाइट्स:

  • ठाण्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेचा मोबाइल चोरला.
  • मोबाइल परत मिळवण्याच्या प्रयत्नात रिक्षातील महिला खाली पडली.
  • खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा झाला मृत्यू.

ठाणे: रिक्षातून मुंबईला घरी जात असताना एका महिलेच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावला. त्यानंतर हा मोबाइल परत मिळवण्याच्या प्रयत्नात धावत्या रिक्षातून तोल जाऊन महिला खाली पडली आणि तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील तीनहात नाक्यापासून काही अंतरावर घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ( Thane Crime Latest News )

वाचा:देशमुख प्रकरणात राज्य सरकारला दिलासा कायम; CBIकडून ‘ही’ ग्वाही

मुंबईतील कलिना परिसरात राहणाऱ्या कन्मिला रायसिंग (वय २७) आणि त्यांची एक मैत्रीण पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मॉलमध्ये काम करतात. कन्मिला मूळच्या मणिपूरच्या असून त्या दोघींनी बुधवारी रात्री कामावरून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षाने मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांची रिक्षा तीनहात नाक्यापासून काही अंतरावर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने कन्मिला यांच्या हातातील मोबाइल खेचला आणि चोरटे पळू लागताच कन्मिला यांनी हा मोबाइल चोरट्याकडून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये त्यांचा तोल गेला आणि धावत्या रिक्षातून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मात्र, दीड तासानंतर रात्री ९.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाचा: वाघाशी मैत्री: चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर खडसेंची फटकेबाजी

कन्मिला यांच्या चोरीला गेलेल्या मोबाइलची किंमत १० हजार रुपये होती. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके बनवण्यात आली आहेत. गुन्हे शाखेकडून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. हा प्रकार समोर येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

आरोपींना लवकरच अटक होईल

हा प्रकार खूपच दु:खद आणि दुर्दैवी असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारासह अन्य कोणतेही गुन्हेगारीचे प्रकार होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल. तसेच आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी सांगितले.

दरम्यान, महिलेच्या मृत्यू प्रकरणात नौपाडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

वाचा: ‘…तोपर्यंत परमबीर सिंह यांना अटक नाही’; हायकोर्टात राज्य सरकारची ग्वाही

Source link

thane crime latest breaking newsthane crime latest newsthane crime updatethane mobile theft latest newsthane woman died after falling from rickshawकन्मिला रायसिंगकलिनाजयजीत सिंगनौपाडा पोलीसपोलीस
Comments (0)
Add Comment