हायलाइट्स:
- जालन्यात नागरिकांना सतर्क राहा
- किरणाच्या दुकानात घडला धक्कादायक प्रकार
- आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश
जालना : करोनाच्या जीवघेण्या संकटामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे चोरीच्या आणि गुन्हांच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पाहायला मिळतात. असाच एक प्रकार जालन्यामध्ये समोर आला आहे. त्यामुळे जालन्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
जालना शहरातील जुना मोंढा भागातील रामप्रसाद जयस्वाल यांच्या मालकीचे किराणा दुकान चोरट्यांनी १३ सप्टेंबर ला फोडून दुकानातील किराणा सामान, इलेक्ट्रिक सामान, गल्यातील पाचशे रुपये घेवून पोबारा केला होता. पण हा चोरलेला सर्व माल एका पोत्यात भरून ते पोते शेजारील दुकानाच्या छतावर ठेवून निघून जातांना परिसरातील काही लोकांनी पाहिल्याने त्यांनी जयस्वाल यांना चोरी झाल्याचे कळवले.
जयस्वाल यांनी लगेच सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये दिनांक १४ सप्टेंबर रोजी गुन्हाही दाखल केला होता. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत आजूबाजूच्या दुकानातील डीव्हीआरचे फुटेज तपासले असता सदरील आरोपी लक्कडकोट भागातील असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाल्याने त्याला पकडण्यासाठी गेल्यावर तो फरार झाल्याचे समजले.
काल दिनांक २३ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी शेख हबीब शेख युसुफ, वय २१ वर्ष राहणार लक्कडकोट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या चोरी विषयी चौकशी केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने जालना शहरातील बसस्थानक संभाजीनगर आणि काही हॉस्पिटलमधून पाच मोबाईल सुध्दा चोरी केल्याचे कबूल करत सुमारे ५८ हजार रुपयांचे हे पाच मोबाईल काढून दिले. आता पोलिसांनी शेख हबीब शेख युसुफ याला ताब्यात घेतले असून त्याने अजून कुठे कुठे चोऱ्या केल्या याची माहिती घेत आहेत.