या संशोधनात सन २०२३मधील हवामान व वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. भविष्यात पृथ्वीच्या अतितापमानवाढीमुळे वर्षाच्या सुरुवातीला विक्रमी उष्णता आणि चक्रीवादळांमुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज या संशोधनात वर्तवण्यात आला आहे. ‘ॲडव्हान्स इन ॲटमॉस्फेरिक सायन्स’ या जर्नलमध्ये यासंबंधीचा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
‘एखाद्या ऋतूमध्ये ज्या घटना घडण्याची शक्यता कमी असते, नेमक्या त्याच ऋतूमध्ये त्या तीव्रतेने घडत असल्याचे समोर येत आहे. नैऋत्य युरोप, ब्राझील, मोरोक्को आणि दक्षिण आफ्रिकेत २०१३च्या वसंत ऋतूमध्ये उष्णतेच्या लाटा जाणवल्या, हे याचेच उदाहरण आहे’, असे या अभ्यासाचे सहलेखक रॉबिन क्लार्क यांनी स्पष्ट केले.
उत्तर अमेरिका, दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियातील अनेक भागांत गेल्या वर्षी जुलैमध्ये एकाच वेळी विक्रमी उष्णता जाणवली, याकडे संशोधकांनी लक्ष वेधले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लिबियामध्ये आलेला पूर आणि जुलैमध्ये उत्तर चीनमध्ये आलेला पूर यांसारख्या तीव्र चक्रीवादळांसह झालेल्या अतिवृष्टीच्या घटनांचीही संशोधकांनी नोंद घेतली. अशा प्रकारच्या वाढत्या घटना या जागतिक तापमानवाढीसंदर्भातील भविष्यातील अंदाजानुसार घडत आहेत, असे मत त्यांनी नोंदवले.
‘सन २०२३मधील अनेक घटना या भविष्यातील उष्णतेतील बदलांशी संबंधित असून, जगापुढील आव्हाने यातून अधोरेखित होतात. काही घटना आश्चर्यकारक आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातील संभाव्य घडामोडींबाबत जाणून घेण्यासारखे अद्याप बरेच काही आहे, हे यातून स्पष्ट होते’, असे या अभ्यासाचे मुख्य लेखक वेन्क्सिया झांग यांनी सांगितले.
गेल्या वर्षी हवाई आणि कॅनडातील जंगलांमध्ये लागलेल्या आगींसारख्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतेच; परंतु जागतिक तापमानवाढीसंबंधी उपाययोजनांसाठीही त्या हितकारक नाहीत, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
अधिक प्रगत प्रणालीची गरज
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील दुष्काळ किंवा आफ्रिकेमधील पूर यांसारख्या अनेक घटना येत्या काही दशकांत घडण्याचा अंदाज आहे. हवामानाशी संबंधित धोक्यांना अधिक तयारीने सामोरे जाता यावे, या दृष्टीने त्यांचे पूर्वानुमान मिळण्यासाठी अधिक प्रगत प्रणालीची गरज असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.