संयुक्त जनता दलाचे खासदार दुलालचंद्र गोस्वामी यांच्या प्रचारार्थ शहा यांची रविवारी सभा झाली. या भाषणात त्यांनी लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसवर खरपूस टीका केली. ओबीसींना त्यांचे अधिकार मिळवून देणारा काका कालेलकर आयोगाचा अहवाल काँग्रेसने गांभीर्याने घेतला नाही. तसेच, कालांतराने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेसने त्यास अनेक वर्षे विरोध केला. याप्रकारे ओबीसीविरोधी राजकारण करणाऱ्या काँग्रेसला आता लालूप्रसाद यादव यांचा पक्ष साथ देत आहे, अशी टीका शहा यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी मात्र ओबीसी आयोगास घटनात्मक दर्जा दिला. मोदी हे पहिले ओबीसी पंतप्रधान आहेत एवढेच नव्हे, तर त्यांच्या मंत्रिमंडळातील ३५ टक्के मंत्री हे मागासवर्गीय आहेत. हे सर्व आमच्या पक्षाच्या धोरणांमुळे शक्य झाले, असेही त्यांनी नमूद केले. तुम्ही (मतदारांनी) राजद व काँग्रेसला पुन्हा साथ दिली तर दंगली, अत्याचार, गरिबी, अन्नधान्याची टंचाई याशिवाय काहीही घडणार नाही. मात्र तुम्ही एनडीएच्या उमेदवारांना मतदान केले तर तुम्हाला डबल इंजिनचे लाभ मिळतील, असेही शहा म्हणाले. नितीश कुमार यांनी बिहारच्या दुर्गम भागांपर्यत वीज पोहोचवली आहे. मात्र ‘इंडिया’ आघाडी या राज्याला पुन्हा कंदीलयुगात नेऊ इच्छिते, असा आरोपही त्यांनी केला.
मोदी सरकारने माओवादाचे व दहशतवादाचे उच्चाटन केले आहे. काँग्रेसच्या राज्यात माओवादी व दहशतवाद्यांना मोकळे रान होते आणि त्यांना प्रतिकार करण्याचेही काँग्रेमध्ये धैर्य नव्हते, असेही शहा म्हणाले.
‘प. बंगालमध्ये अराजक’
जलांगी (प. बंगाल) : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील प. बंगालमध्ये अराजक निर्माण झाले आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केला. ते एका प्रचारसभेत बोलत होते. येथे कायद्याचे राज्य नाही. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी एक महिला असूनही संदेशखालीसारख्या घटना घडतात. संदेशखालीतील महिला अत्याचारामुळे जगभरात अनेकांची मान शरमेने खाली गेली आहे. येथे गुंडाराज असून सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत, असेही ते म्हणाले.