हायलाइट्स:
- पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईवरून राजू शेट्टी आक्रमक
- राज्य सरकारला दिली आठ दिवसांची मुदत
- किरीट सोमय्या यांच्यावरही उठवली टीकेची झोड
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पूरग्रस्त नागरिकांना आठ दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास या भागात मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापुरात दिला. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे केवळ विशिष्ट लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘महापूर येऊन दोन महिने उलटले. अजूनही शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना सरकारची मदत मिळाली नाही. लवकरात लवकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांची थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे देणार की नाही आणि देणार असाल तर कधी देणार, किती देणार हे जाहीर करा असे आवाहन करतानाच आठ दिवसांत मदत न मिळाल्यास मंत्र्यांना भागात फिरणे मुश्कील करू, त्यांच्या गाड्या अडवू,असा इशाराही त्यांनी दिला.
वाचा: मुंबई-नाशिक एक्स्प्रेस वेची अवस्था पाहिली का?; हायकोर्टाचा सरकारला सवाल
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल करताना शेट्टी म्हणाले, आम्ही साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढताना प्रांत, पक्ष असा भेदभाव कधीच केला नाही. देशातील सर्व राज्यातील साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला. सोमय्या मात्र विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा, असा टोलाही त्यांनी मारला.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ठराविक लोकांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेण्यात आली. यंदा मात्र दसऱ्यानंतर नेहमीप्रमाणे भव्य उस परिषद घेण्यात येईल. त्याला कोणीही अडवू शकणार नाहीत असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
वाचा: छगन भुजबळांनी विकास निधी विकला; शिवसेनेचा आमदार हायकोर्टात
राजू शेट्टी-किरीट सोमय्या