‘सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींनी वापरलेले पिस्तुल शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक सुरतला आले आहे. शोधासाठी आमची पथके मुंबई पोलिसांना सहकार्य करत आहेत,’ असे सुरतचे पोलिस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी सांगितले.
या दोन आरोपींनी १४ एप्रिल रोजी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीतील घराबाहेर गोळीबार करून नंतर मोटरसायकलवरून पळ काढला होता. मुंबई पोलिस आणि कच्छ पोलिसांनी तांत्रिक तपासाआधारे, १६ एप्रिल रोजी या दोन्ही आरोपींना भुज शहरातून अटक केली होती. या आरोपींनी बिष्णोई टोळीच्या सांगण्यावरून हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बिष्णोई बंधूंना या प्रकरणी ‘वाँटेड’ घोषित केले आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे. लॉरेन्स बिष्णोई हा गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे, तर त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई अमेरिका किंवा कॅनडामध्ये असल्याचा अंदाज आहे.
गोळीबारानंतर गुजरातला काढला पळविकी गुप्ता आणि सागर पाल या दोन आरोपींनी गोळीबार केल्यानंतर मुंबईहून रस्तेमार्गे गुजरातमधील सुरतला पळ काढला होता. त्यानंतर सुरतहून ट्रेनने भुजला जात असताना, रेल्वे पुलावरून त्यांनी तापी नदीत पिस्तुल भिरकावले होते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना चौकशीत दिली होती.