शेतात बेकायदा खणलेल्या खड्ड्यांत पडून ५ बालकांचा मृत्यू; NGTने ठोठावला १ कोटींचा दंड

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात मातीउपसा करण्यासाठी शेतात बेकायदा खणलेल्या खड्ड्यांत पडून पाच बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी, राष्ट्रीय हरित लवादाने दोन वीटभट्ट्यांना तब्बल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मा भगवती ब्रिक फील्ड आणि श्री राम ब्रिक फील्ड या दोन वीटभट्ट्यांनी मातीसाठी शेतजमिनीत खड्डे खणले होते. हे खड्डे नंतर तसेच सोडून दिल्याने पावसाळ्यात त्यात पाणी भरले होते. त्यामुळे मागील वर्षी त्यामध्ये पडून पाच बालकांचा मृत्यू झाला होता. मागील वर्षी २७ जून रोजी सुमारे दोन मीटर खोलीच्या या खड्ड्यांमध्ये पडून चार बालकांचा मृत्यू झाला होता. तीन वर्षे, आठ वर्षे, दहा वर्षे आणि बारा वर्षे अशी या बालकांची वये होती. तर त्यानंतर महिनाभरात एका १३ वर्षीय मुलाचा दुसऱ्या एका खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यासंदर्भातील सुनावणी राष्ट्रीय हरित लवादासमोर सुरू होती.

राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष प्रकाश श्रीवास्तव यांनी या प्रकरणातील सर्व पुराव्यांची दखल घेतली. ‘या दोन वीटभट्ट्यांनी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा अधिक माती उपसण्यासाठी खणलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने, हे खड्डे दिसून न आल्याने त्यात पडून पाच मुलांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झाले आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित वीटभट्ट्यांनी खोदकाम केलेली जागा ताब्यात घेतली नाही किंवा त्याभोवती कुंपण उभारले नाही, असे लवादाने स्पष्ट केले. या पीठामध्ये न्या. सुधीर अग्रवाल आणि तज्ज्ञ सदस्य ए. सेंथील वेल आणि अफरोज अहमद यांचा समावेश होता.

या संदर्भातील आदेश लवादाने १८ एप्रिल रोजी दिला. त्यानुसार मा भगवती ब्रिक फील्ड ही तीन मुलांच्या मृत्यूस, तर श्री राम ब्रिक फील्ड ही दोन मुलांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रत्येक मृत मुलाच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश लवादाने दिले.

दोन महिन्यांत रक्कम द्या

भरपाईची ही रक्कम संबंधित पीडित कुटुंबांना वितरित करण्याचे आणि त्यानंतर त्याची वसुली संबंधित वीटभट्ट्यांकडून ते वसूल करण्याचे निर्देश लवादाने राज्य सरकारला दिले. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबांना दोन महिन्यांत ही रक्कम वितरित करावी आणि तीन महिन्यांत यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे लवादाने स्पष्ट केले.

Source link

child death case Muzaffarnagarchildren death casenational green tribunalराष्ट्रीय हरित लवादवीटभट्ट्या
Comments (0)
Add Comment