अनिल परबांविरुद्ध सोमय्यांना माहिती कुणी पुरवली?; कर्वे अखेर बोलले

हायलाइट्स:

  • अनिल परबांविरुद्ध सोमय्यांना माहिती कुणी दिली?
  • माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे आले समोर.
  • नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे सर्व दावे फेटाळले.

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिक प्रसाद उर्फ बाळा कर्वे यांचे नाव गेले काही दिवस अचानक चर्चेत आले आहे. खेडचे नगराध्यक्ष व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी कर्वे यांचे नाव घेतले होते. शिवसेना नेते रामदास कदम यांनी कर्वे यांच्या माध्यमातून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत माहिती मिळवून ती माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप खेडेकर यांनी केला होता. यासंदर्भात आता प्रसाद कर्वे यांनीच प्रतिक्रिया दिली असून खेडेकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ( Anil Parab Vs Kirit Somaiya Update )

वाचा: गणेशोत्सवानंतर राज्यात निर्बंध कधीपर्यंत; सरकारने हायकोर्टात केलं स्पष्ट

‘नगराध्यक्षपदावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने वैभव खेडेकर हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ते माझे नाव घेत आहेत. मी ही माहिती आमदार रामदास कदम यांना दिल्याचा आरोप ते करत आहेत. यात कोणतेही तथ्य नाही. मी कडवट शिवसैनिक आहे. शिवसेनेशी मी अशी गद्दारी कधीही करणार नाही’, असे कर्वे यांनी सांगितले. ‘वैभव खेडेकर हे अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते, तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांना त्यांनी संपर्क केला मात्र त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच त्यांचा जळफळाट होत असल्याचेही कर्वे म्हणाले. मी शिवसेनेत गेली ३५ वर्षे कार्यरत आहे. दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, खासदार गजानन कीर्तिकर यांच्याबरोबर मी काम केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत असून तेही मला ओळखत होते, असे सांगत कर्वे यांनी निष्ठेचे दाखले दिले. माजी खासदार अनंत गीते यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत जी भूमिका मांडली ती योग्यच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वाचा: अमित शहांसोबत बैठक; मुख्यमंत्री ठाकरेंना पवारांनी काय सांगितलं?

दरम्यान, वैभव खेडेकर हे दापोली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कर्वे यांच्या आरोपांना उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांवर संपूर्ण राज्याचा भार आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने त्यांना भेटणे व त्यांची वेळ मिळणे इतके सोपे नसते, असे सांगत वर्षावर आपण गेलो नसल्याचे खेडेकर म्हणाले. त्यांनी कर्वे यांचे सर्वच आरोप फेटाळून लावले. मी केलेले आरोप खरे की खोटे हे येणारा काळ ठरवेल आणी राजकीय धमाका होईल. मी कोणत्याही कारवाईला, अपात्रतेला भीत नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे, असे सांगत कोण वैफल्यग्रस्त आहे आणि कोणाचे मानसिक संतुलन बिघडले आहे हे लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

काय आहे नेमकं प्रकरण?

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती प्रसाद कर्वे या व्यक्तीच्या माध्यमातून रामदास कदम यांनी माहिती अधिकाराखाली मिळवली आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवली, असा आरोप मनसेचे वैभव खेडेकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर रामदास कदम यांनी हा दावा फेटाळत खेडेकरांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे. असे असताना आता प्रसाद कर्वे यांनीच समोर येत खेडेकर यांच्यावर निशाणा साधला असून हे प्रकरण आणखी कोणते वळण घेते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाइडलाइन्स जारी

Source link

anil parab dapoli resort newsanil parab vs kirit somaiyaanil parab vs kirit somaiya updatesprasad karve on vaibhav khedekars claimramdas kadam newsअनिल परबकिरीट सोमय्याप्रसाद कर्वेरामदास कदमवैभव खेडेकर
Comments (0)
Add Comment